आमदारांचा माेबाइल हिसकावणारा ऑटो रिक्षाचालक गजाआड
By नितिन गव्हाळे | Published: May 23, 2023 01:35 PM2023-05-23T13:35:10+5:302023-05-23T13:35:18+5:30
ऑटो चालकांची मनमानी वाढली : वाहतूक नियंत्रण शाखेचे दुर्लक्ष
अकाेला : एका ऑटाे चालकाने आमदार वसंत खंडेलवाल यांचा रस्ता अडविला. त्याला अनेक हॉर्न दिल्यानंतरही तो रस्त्यातून हटायला तयार नव्हता. त्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या आमदार खंडेलवाल यांच्याशी उलट त्याने वाद घालत, त्यांचा मोबाइल हिसकावल्याची घटना रविवारी रात्री १०:४५ वाजेच्या सुमारास खंडेलवाल भवनजवळ घडली. या प्रकरणात खदान पोलिसांनी ऑटो चालक शफिऊर रहेमान खान मुमताज खान (२८), रा. बैदपुरा याला अटक केली. न्यायालयाने एक दिवसाची पोलिस काेठडी सुनावली.
विधान परिषदेतील भाजपचे आमदार वसंत खंडेलवाल हे नेहमीप्रमाणे रात्री सराफा दुकानातून खंडेलवाल भवनजवळ येथील निवासस्थानी जात हाेते. या मार्गावरील काेपऱ्यावर एक ऑटाे चालक रस्त्यात ऑटाे आडवा लावून उभा हाेता. गाडीचा हाॅर्न वाजवूनही ऑटाे चालकाने ऑटाे बाजूला केला नाही. त्यामुळे आ. खंडेलवाल हे खाली उतरले, त्याला याबाबत जाब विचारला असता, ऑटो चालकाने हुज्जत घातली.
खंडेलवाल यांनी माेबाइलद्वारे ऑटाे चालकाचा फाेटाे काढत असताना, चालकाने त्यांचा माेबाइल हिसकावून पळ काढला. दरम्यान, माेबाइल खाली पडला. आमदार खंडेलवाल यांनी खदान पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी एमएच ३० एए ५६३१ क्रमांकाचा ऑटो रिक्षा चालक शफिऊर रहेमान खान मुमताज खान (२८), रा. बैदपुरा याला अटक केली. पुढील तपास एपीआय माधव पडघान करीत आहेत.
आमदार असल्याचे माहीत नव्हते!
खदान पोलिसांनी ऑटो चालक शफिऊर रहेमान खान याला अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता, त्याने वसंत खंडेलवाल हे आमदार असल्याचे त्याला माहीत नव्हते, त्यामुळे नकळत त्याच्या हातून हे कृत्य घडल्याचे ऑटो चालकाने पोलिसांना सांगितले.