'या' दिवशी होणार वर्षातील सर्वात मोठा उल्कावर्षाव; दर ताशी १०० ते १२० उल्कांचे दर्शन
By Atul.jaiswal | Published: December 9, 2023 04:04 PM2023-12-09T16:04:59+5:302023-12-09T16:05:07+5:30
निरभ्र रात्री आकाशात एखादी प्रकाशरेखा क्षणार्धात चमकुन जाते. यालाच काही लोक तारा तुटला असे म्हणतात.
अकोला : वर्षभर विविध खगोलीय घटनांचा अनुभव घेतल्यानंतर येत्या १३ व १४ डिसेंबरच्या रात्री या वर्षातील सर्वात मोठा उल्का वर्षाव राशीचक्रातील मिथुन राशीतून होणार आहे. या वेळी दर ताशी सुमारे १०० ते १२० लहान मोठ्या विविधरंगी प्रकाशरेखा आकाशात उमटणार असून, डोळयांचे पारणे फेडणारा हा नजारा नुसत्या डोळ्यांनी पाहण्याची पर्वणी चालून येत आहे.
निरभ्र रात्री आकाशात एखादी प्रकाशरेखा क्षणार्धात चमकुन जाते. यालाच काही लोक तारा तुटला असे म्हणतात. परंतु ती उल्का असते. अशा अनेक उल्का रोजच पडत असतात. विशेषत: धुमकेतू, लघुग्रह, उपग्रह इत्यादी वस्तू जेव्हा पृथ्वी कक्षेत येतात तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे या वस्तू वातावरणात घर्षणामुळे पेट घेऊन आपल्या नजरेस पडतात. अपवादात्मक एखादी उल्का पृथ्वीवर अशनी स्वरुपात आदळते. काही उल्का कक्षा आणि पृथ्वी कक्षा निश्चित असल्याने आकाशात ठराविक कालावधीत ठराविक तारका समूहातून उल्कांचा वर्षाव अनुभवता येतो.
यावेळचा हा उल्कावर्षाव मिथुन राशीतून होणार आहे. ही राशी नऊ नंतर पूर्व आकाशात मृग नक्षत्राजवळ बघता येईल. रात्र जसजशी वाढत जाईल तसतसा उल्का वर्षाव वाढत जाऊन दरताशी सुमारे शंभर ते सव्वाशे उल्का पडताना दिसतील. त्यासाठी अधिकाधिक अंधाऱ्या भागातून झोपलेल्या अवस्थेत पडून या विविधरंगी प्रकाश उत्सवात सहभागी होता येईल.
मध्यरात्रीनंतर पहाटे पर्यंत उल्कांचा वेग वाढलेला असेल. यावेळी आकाशात चंद्र सुध्दा नसल्याने अनेक छोट्या उल्का सुध्दा आपल्या डोळ्यात साठवून आनंदात भर देता येईल. या अनोख्या घटनेचा आनंद आपण सर्वांनी घ्यावा.
- प्रभाकर दोड, ज्येष्ठ खगोल अभ्यासक, अकोला