बंद पडलेली 'शकुंतला' पुन्हा धावण्याची आशा पल्लवित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2022 06:37 PM2022-08-16T18:37:53+5:302022-08-16T18:37:59+5:30
Shakuntala Train : थोडा विलंब लागेल, परंतु २०२४ पूर्वी शकुंतला एक्स्प्रेस आहे त्या स्थितीत सुरू होईल.
मूर्तिजापूर :अचलपूर-मूर्तिजापूर-यवतमाळ दरम्यान धावणारी, मात्र गेली साडेतीन वर्षे बंद असलेली 'शकुंतला' नावाने ओळखल्या जाणारी रेल्वे गाडी, आहे त्या स्थितीत निश्चितपणे सुरू होईल, अशी ग्वाही खासदार नवनित राणा यांनी १५ ऑगष्ट रोजी शकुंतला बचाव सत्याग्रह समितीच्या शिष्टमंडळाला दिली.
प्रकाश बोनगिरे, प्रा. अविनाश बेलाडकर, अजय प्रभे, प्रिया सुनिल तायडे, अमोल भोरकडे यांनी माजी नगराध्यक्ष तथा मध्य रेल्वेच्या प्रवासी सुविधा समितीचे सदस्य नानकराम नेभनाणी यांच्यासमवेत नवनीत राणा यांची त्यांच्या अमरावतीस्थित निवासस्थानी भेट घेतली. तब्बल पाऊण तास त्यांनी या विषयावर दिलखुलास चर्चा केली. यासंदर्भातील पूर्वीच्या व आताच्या रेल्वेमंत्र्यांशी झालेल्या चर्चेची सविस्तर माहिती दिली.
वर्षभरापासून शकुंतला पूर्ववत सुरू करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय विल्हेकर यांच्या नेतृत्वात सत्याग्रही विविध उपक्रमांमधून जनजागृती करीत आहेत व अधिकारी, पदाधिकाऱ्यांना आर्जवे करीत आहेत.
दुसरीकडे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा संसदेत हा मुद्दा लावून धरत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाचा परिणाम म्हणून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अचलपूर ते यवतमाळ हा लोहमार्ग टेकओव्हर करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने जून २०२२ मध्ये घेतल्याचे स्पष्ट करणारे पत्र दिले आहे. त्यामुळे थोडा विलंब लागेल, परंतु २०२४ पूर्वी शकुंतला एक्स्प्रेस आहे त्या स्थितीत सुरू होईल. त्यानंतर यथावकाश देशातील सर्व लोहमार्ग ब्रॉडगेज करण्याच्या धोरणानुसार या लोहमार्गाचेही ब्रॉडगेज मध्ये रुपांतरण होईल, अशी खात्री खासदार नवनीत राणा यांनी दिली.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी 'शकुंतला' पूर्ववत सुरू करण्यासाठी लागणाऱ्या निधीतील अर्धा वाटा राज्य शासनाने उचलावा, अर्धा केंद्र शासन उचलेल, असे आश्वासन येथील रेल्वे स्थानकावर सत्याग्रहींशी बोलताना दिले आहे. त्यांना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खासदार राणा यांनी 'शकुंतला' सुरु करण्यबाबत शिफारसपत्र दिले आहे. अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांमधील आमदारांची शिफारसपत्रे मुख्यमंत्री व उपमुख्य मंत्र्यांना देण्यासाठी सत्याग्रही गोळा करीत आहेत.