20 मजुरांना घेऊन जाणारी क्रुझर पलटली; सुदैवाने बचावले कामगार
By Atul.jaiswal | Published: October 15, 2022 09:02 AM2022-10-15T09:02:16+5:302022-10-15T09:15:59+5:30
सोयाबीन सोंगणीचा हंगाम असल्याने मध्यप्रदेशातील दुर्मिळ भागातून शेकडो मजूर या कामासाठी विदर्भात दाखल होतात
मूर्तिजापूर (जि. अकोला) : मध्ये प्रदेशातून वाशीम जिल्ह्य़ातील धनज, कामरगाव येथे मजूर घेऊन जात असलेल्या चारचाकी वाहनाला आपघात होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्यात जाऊन उलटल्याची घटना १५ ऑक्टोबर रोजी पहाटे ४:३० वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान मूर्तिजापूर - दर्यापूर रोडवरील सिरसो प्लॉटजवळ हा भीषण अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणून २० मजूर सुखरूप बचावले.
सोयाबीन सोंगणीचा हंगाम असल्याने मध्यप्रदेशातील दुर्मिळ भागातून शेकडो मजूर या कामासाठी विदर्भात दाखल होतात, शनिवारी पहाटे या मजुरांनी खचाखच भरलेली कृझर चारचाकी वाहन क्रमांक एमपी ०४ बीसी ६४७१ हे मूर्तिजापूरच्या दिशेने भरधाव येत असताना समोरचे चाक तुटून पडल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या चारचाकी वाहनात लहानमोठे २० च्यावर मजूर बसून असल्याची माहिती आहे. भरधाव वाहन खोल खड्ड्यात जाऊन उलटले असताना देखील कोणालाही इजा झाली नाही. दैव बलवत्तर म्हणून सर्व मजूर सुखरूप बचावले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.