जिल्ह्याला बारदान्याच्या १२० गाठी प्राप्त! शेतकऱ्यांना दिलासा
By रवी दामोदर | Published: April 17, 2023 04:34 PM2023-04-17T16:34:28+5:302023-04-17T16:41:01+5:30
दहाही केंद्रावर पुन्हा खरेदी सुरळीत
रवी दामोदर, अकोला: केंद्र सरकारच्या आधारभूत किमतीमध्ये नाफेडद्वारा हरभरा खरेदीला सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांचा प्रतिसादही मिळत आहे. दरम्यान, गत दि. १३ एप्रिलपासून बारदान्याअभावी खरेदी रखडली होती. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी खरेदीच्या प्रतीक्षेत होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्तसुद्धा प्रकाशित करीत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. रविवार, दि. १६ एप्रिल रोजी जिल्ह्याला बारदान्याच्या १२० गाठी प्राप्त झाल्याने खरेदी पुन्हा पूर्ववत सुरू झाली असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
खासगी बाजारात भाव कमी असल्याने प्रतीक्षा असलेली हरभऱ्याची शासकीय खरेदी दि. १४ मार्चपासून सुरू झाली आहे. शासनाने यंदा ५,३३५ रुपये हमीभाव जाहीर केलेला असताना ४,३०० ते ४,६०० रूपये क्विंटलदरम्यान बाजार समित्यांमध्ये भाव मिळत आहे. हरभऱ्याला खुल्या बाजारपेठेत अद्याप हमीभाव इतका दर मिळालेला नाही. त्यामुळे हरभऱ्याच्या शासकीय खरेदीला शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. शेतकऱ्यांकडून नाफेडद्वारा शेतमाल खरेदी सुरू होती; मात्र दि. १३ एप्रिलपासून बारदान्याअभावी खरेदी रखडली होती. ऐन खरीप हंगामाची तयारी तोंडावर असताना नाफेडद्वारा खरेदी थांबल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. खरेदी पूर्ववत होण्यासाठी जिल्हा मार्केटिंग कार्यालयाकडून पत्रव्यवहार करण्यात आले होते. रविवारी जिल्ह्याला १२० गाठी प्राप्त झाल्या असून, दहाही केंद्रावर खरेदी पूर्ववत सुरू झाली आहे. जिल्ह्यात तब्बल १८ हजारांवर शेतकऱ्यांनी नाफेडकडे ऑनलाइन नोंदणी केली आहे.
१ गाठीत असतात ५०० कट्टे
जिल्ह्यात नाफेड केंद्रावर बारदान्याअभावी खरेदी थांबली होती. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता बारदाना कलकत्ता येथून निघाल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, बारदान्याच्या गाठी घेऊन दोन ट्रक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे रविवारपासूनच खरेदी केंद्रावर खरेदी सुरळीत करण्यात आली आहे. एका गाठीमध्ये ५०० कट्टे असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार, जिल्ह्याला तब्बल ६० हजार कट्टे प्राप्त झाले आहेत.