ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने चालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2022 18:30 IST2022-06-19T18:29:53+5:302022-06-19T18:30:03+5:30
Accident News : संजय देवमण निमकंडे हे रोजंदारीवर ट्रॅक्टर चालक म्हणून काम करीत होते.

ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने चालकाचा मृत्यू
मूर्तिजापूर : शेतीच्या मशागतीच्या कामाला गती आली आहे. शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर शेतात असताना ट्रॅक्टरचे चाक जमीनीत रुतले, जमीनीत फसलेले ट्रॅक्टर काढण्याच्या प्रयत्नात चालकाचा तोल जाऊन तो चाकाखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील पारद येथे १९ जून रोजी सकाळी ९:३० वाजताच्या दरम्यान घडली. संजय देवमन निमकंडे(४२) असे मृतकाचे नाव आहे.
संजय देवमण निमकंडे हे रोजंदारीवर ट्रॅक्टर चालक म्हणून काम करीत होते. रविवारी गावातील विश्वनाथ तायडे याच्यात शेतात शेती मशागतीसाठी ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३० झेड १२७३ सुरु असताना पावसाने दलदल झालेल्या शेतात अचानक ट्रॅक्टर फसला. अशातच संजय निमकंडे ट्रॅक्टर वरुन तोल जाऊन चाका खाली आल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस स्टेशनचे हेड पोलिस कॉन्स्टेबल संजय खंडारे घटना स्थळावर दाखल झाले. लगेचच जखमी संजय निमकंडे यांना अकोला येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणी ग्रामीण पोलीसांत कुठल्याही फिर्यादी दाखल झाली नव्हती.