नाफेडने खरेदी केलेल्या हरभऱ्याचे पैसे थकले!
By राजेश भोजेकर | Published: April 17, 2023 04:42 PM2023-04-17T16:42:14+5:302023-04-17T16:42:23+5:30
खुल्या बाजारात भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडच्या शासकीय हरभरा खरेदी केंद्रात हरभरा विक्री केला.
अकाेला : खुल्या बाजारात भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडच्या शासकीय हरभरा खरेदी केंद्रात हरभरा विक्री केला. परंतु, या शेतकऱ्यांचे पैसे थकल्याने अडचणी वाढल्या आहे. त्यात लग्नसराई तोंडावर असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गत खरिपात अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे उत्पन्नात घट आली. मात्र, शेतकऱ्यांनी खचून न जाता रब्बी हंगामात हरभऱ्याची लागवड केली. या हरभरा पिकाच्या भरवशावर आर्थिक अडचणी दूर होतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, खुल्या बाजारात हरभऱ्याचे दर कमी असल्याचे चिंता वाढली होती. त्यानंतर नाफेडच्या माध्यमातून हमीदराने हरभरा खरेदी सुरू झाली. मात्र, शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर हरभरा विक्री करून एक महिना लोटला आहे.
मात्र, अद्यापपर्यंत पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तेल्हारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा प्रकार सर्वाधीक आहे. या बाजार समिती अंतर्गत विविध गावातील ८५० शेतकऱ्यांना संदेश प्राप्त झाला. त्यानुसार शेतकऱ्यांनी तेथे माल मोजमाप करून दिला. परंतु, एक महिन्यापासून पैसे आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यावर ऐन लग्नसराई आर्थिक संकट ओढावले आहे.