अकोला शहरात १५ पक्षांच्या समन्वयातून हाेणार महायुतीचा मेळावा
By आशीष गावंडे | Published: January 10, 2024 04:22 PM2024-01-10T16:22:20+5:302024-01-10T16:23:27+5:30
पत्रकार परिषदेत भाजप प्रदेश सरचिटणीस सावरकर यांची माहिती.
आशिष गावंडे, अकाेला: आगामी लाेकसभा निवडणूक महायुतीमध्ये समावेश असलेल्या राज्यभरातील १५ राजकीय पक्षांच्या समन्वयातून लढवली जाणार आहे. राज्याच्या विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी महायुती सरकारने प्रामाणीक प्रयत्न केले आहेत. ही बाब जनतेसमाेर मांडण्यासाठी आम्ही सज्ज झालाे असून महायुतीमधील पदाधिकाऱ्यांसाठी येत्या १४ जानेवारी राेजी दुपारी तीन वाजता खुले नाट्यगृह येथे मेळाव्याचे आयाेजन करण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यात महायुती सरकारने विकासाचे अनेक माेठे प्रकल्प मार्गी लावण्यासाेबतच शासन आपल्या दारी अभियानच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामे निकाली काढली आहेत. आगामी हाेऊ घातलेल्या लाेकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादीसह इतर अनेक प्रमुख पक्ष सज्ज झाले असल्याची माहिती आमदार रणधीर सावरकर यांनी दिली. युतीमध्ये सामील झालेल्या विविध पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांचा आपसांतील समन्वय अधिक वृध्दींगत व्हावा, याकरीता १४ जानेवारी राेजी राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये मेळाव्यांचे आयाेजन केले जाणार आहे.
अकाेल्यातही स्थानिक खुले नाट्यगृह येथे मेळावा पार पडणार असल्याची माहिती आ.सावरकर यांनी दिली. पत्रकार परिषदेला विधान परिषद सदस्य वसंत खंडेलवाल, शिवसेनेचे उपनेता तथा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, तुकाराम बिडकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे महानगराध्यक्ष विजय देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशाेर मांगटे पाटील, महानगराध्यक्ष जयंत मसने, विजय अग्रवाल, अनुप धोत्रे, श्रीरंग पिंजरकर, सेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप, अश्विन नवले, प्रहार पक्षाचे मनोज पाटील आदी उपस्थित हाेते.
देशात रामराज्य असल्याचे वातावरण :
येत्या २२ जानेवारी राेजी अयाेध्येत प्रभु श्री राम यांचा प्राणप्रतिष्ठा साेहळा माेठ्या उत्साहात साजरा केला असल्याने प्रदिर्घ कालावधीनंतर देशात रामराज्य असल्याचे वातावरण अनुभवयास मिळत आहे. ही बाब ध्यानात ठेऊनच लाेकसभा निवडणुकीसाठी समन्वयातून काम केले जाणार असल्याचे शिवसेनेचे (शिंदे गट)उपनेते मा.आमदार गाेपीकिशन बाजाेरिया यांनी सांगितले.