पशुधन विकास मंडळ मुख्यालयाचे अकाेल्यात हाेणार स्थानांतरण

By आशीष गावंडे | Published: December 20, 2023 12:35 AM2023-12-20T00:35:37+5:302023-12-20T00:36:36+5:30

महसूल,पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

The headquarters of the Animal Development Board will be shifted to Akola | पशुधन विकास मंडळ मुख्यालयाचे अकाेल्यात हाेणार स्थानांतरण

पशुधन विकास मंडळ मुख्यालयाचे अकाेल्यात हाेणार स्थानांतरण

आशिष गावंडे, अकोला: पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय नागपूर येथून परत अकाेल्यात स्थानांतरीत करण्याचे निर्देश महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दिले. काेणत्याही ठाेस कारणाशिवाय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात शहरातील पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय नागपूर येथे स्थानांतरीत केले हाेते. सदर मुख्यालय अकाेला शहरात स्थानांतरित करण्याची मागणी भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर यांनी लावून धरली हाेती.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत अकाेला शहरातील पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय नागपूर येथे स्थानांतरीत करण्यात आले होते. पश्चिम विदर्भातील पशुपालकांची माेठी संख्या लक्षात घेता व त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी पशुधन विकास मंडळ कार्यालयाची नितांत आवश्यकता असल्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लावून धरली.

राज्यातील मागासलेल्या भागात संकरित पैदासीच्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून दुग्ध उत्पादन व ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीस उत्तेजन देण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ ही स्वायत्त संस्था स्थापन करण्यात येवून सदर संस्थेचे मुख्यालय अकोला येथे सन २००२ पासून कार्यरत होते. पश्चिम विदर्भातील आर्थिक मागासलेपण लक्षात घेता पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोला येथे असणे आवश्यक असल्याचा मुद्दा आ.सावरकर यांनी सभागृहात मांडला.

मुख्यालयाच्या इमारतीसाठी निधीची तरतूद

शहरात पशुधन विकास मंडळाची सुमारे २ हेक्टर जागा उपलब्ध आहे. मुख्यालयाची प्रशासकीय इमारत तसेच आयुक्तांच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत सन २०१९-२० मध्ये ६.१० कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले होते. पश्चिम विदर्भातील पशुपालकांची गरज लक्षात घेता अकाेला शहरात मुख्यालय स्थानांतरित करण्याची मागणी आ.सावरकर यांनी केली असता, मुख्यालय अकोल्यात स्थानांतरित करुन त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश महसूल, पशुसंर्वधन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

Web Title: The headquarters of the Animal Development Board will be shifted to Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला