रस्ते कामांची यादी, शेतीच्या लिलावावर सत्ताधारी विरोधक आमने-सामने !
By संतोष येलकर | Published: September 20, 2023 07:08 PM2023-09-20T19:08:16+5:302023-09-20T19:08:58+5:30
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गोंधळ अन् वादळी चर्चेने गाजली
अकोला : जिल्ह्यातील इतर जिल्हा मार्ग आणि ग्रामीण मार्ग (रस्ते) कामांची मंजूर यादी इतिवृत्तासोबत का देण्यात आली नाही, अशी विचारणा करीत, हाता येथील शेतजमिनीच्या लिलाव प्रक्रियेवर विरोधी गटाच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतल्याने बुधवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने आले. त्यामुळे या मुद्द्यावरील वादळी चर्चा आणि गोंधळाने ही सभा चांगलीच गाजली.
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनांतर्गत जिल्ह्यातील इतर जिल्हा मार्ग (इजिमा) आणि ग्रामीण मार्ग इत्यादी रस्ते कामांची मंजूर अंतिम यादी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तासोबत सदस्यांना का देण्यात आली नाही, अशी विचारणा शिवसेना ठाकरे गटाचे सदस्य डाॅ. प्रशांत अढाऊ, गटनेता गोपाल दातकर यांनी केली. तसेच मंजूर संबंधित रस्ते कामांची यादी इतिवृत्तासोबत दिली नसल्याने, मागील सभेत इतिवृत्त मंजूर कसे करणार, असा प्रश्न अपक्ष सदस्य गजानन पुंडकर यांनी सभेत उपस्थित केला. तसेच हाता येथील जिल्हा परिषदेची शेतजमीन वहितीसाठी देण्यासाठी राबविण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेत अत्यल्प दर मिळाल्याने, यासंदर्भात तडजोड करून लिलाव प्रक्रिया राबविण्याचे अधिकार मागील सभेत अध्यक्षांना देण्यात आले होते. त्यावर काय कार्यवाही करण्यात आली, अशी विचारणा शिवसेना ठाकरे गटाचे गटनेता गोपाल दातकर यांनी केली. त्यानुषंगाने यासंदर्भात सत्तापक्षाचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने भूमिका मांडत असताना त्यावर दातकर यांच्यासह डाॅ. प्रशांत अढाऊ, गजानन पुंडकर यांनी आक्षेप घेत, यासंदर्भात अध्यक्षांनीच उत्तर दिले पाहीजे, अशी मागणी रेटून धरली. त्यामुळे या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधी गटाच्या सदस्यांमध्ये वादळी चर्चा झाल्याने सभेत काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपाध्यक्ष सुनील फाटकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे, शिक्षण सभापती माया नाईक, महिला बालकल्याण सभापती रिजवाना परवीन, कृषी व पशुसंवर्धन सभापती योगिता रोकडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.