कर्जमाफी मिळालीच नाही; शेतकरी अन्याय निवारण कृती समितीचा ठिय्या
By रवी दामोदर | Published: November 10, 2023 05:03 PM2023-11-10T17:03:01+5:302023-11-10T17:03:23+5:30
शेतकरी अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत १० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
अकोला : राज्यात युती सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. परंतु, लाखो शेतकरी कर्जमाफीच्या योजनेपासून वंचित आहेत. गत सहा वर्षांपासून जिल्ह्यातील १३ हजार ३४ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. त्यामध्ये अडगाव सर्कलमधील २४८ सभासदांचा समावेश असून, त्यापैकी चार शेतकऱ्यांचा तर कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला. मात्र, तरीही अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याने शेतकरी अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत १० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. तसेच ‘त्या’ शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांमार्फत परत केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करीत युती सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोपही शेतकरी अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने करण्यात आला. शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांना अद्याप बँक / संस्थेच्या वतीने कर्ज ‘नील’ असल्याचा दाखला मिळाला नसल्याने त्या शेतकऱ्यांना दुसरे कर्ज व इतर लाभ घेता येत नसल्याची स्थिती आहे. या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने आक्रमक भूमिका घेत ठिय्या आंदोलन सुरू केले. हिवाळी अधिवेशनापूर्वी कर्जमाफी न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सुद्धा समितीच्या वतीने देण्यात आला. यावेळी शेतकरी अन्याय निवारण कृती समिती, अडगावचे अध्यक्ष अशोक राम घाटे, उपाध्यक्ष राहतखान माजितखान, सचिव अमोल मसुरकार, सदस्य गोपाल कोल्हे, रितेश देशमुख, गजानन मुंगसे, अनिल मानकर, सल्लागार मनोहरलाल फाफट, लक्ष्मीकांत कौठकर आदी उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची आंदोलनस्थळी भेट
शेतकरी अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनस्थळी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता अढाऊ, उपाध्यक्ष सुनील फाटकर, गजानन गवई आदी उपस्थित होते.