दारुमुळे आईला त्रास, मुलाने रागाच्या भरात दगड डोक्यात घालून केली वडिलांची हत्या 

By नितिन गव्हाळे | Published: May 12, 2023 07:57 PM2023-05-12T19:57:29+5:302023-05-12T19:57:56+5:30

या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मुलास अटक केली आहे. 

The mother was troubled by husbands alcohol adiction, the son killed his father by throwing a stone on his head in a fit of anger | दारुमुळे आईला त्रास, मुलाने रागाच्या भरात दगड डोक्यात घालून केली वडिलांची हत्या 

दारुमुळे आईला त्रास, मुलाने रागाच्या भरात दगड डोक्यात घालून केली वडिलांची हत्या 

googlenewsNext

अकोला - वडिलांच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून आई दोन मुलांना घेऊन अकोल्यात आली. परंतु या ठिकाणीही दारुड्या वडिलांनी त्यांचा माग सोडला नाही. ते घरी येऊन दारूच्या नशेत दररोज धुडगूस घालायचे. आई व भावाला मारहाण करायचे. शुक्रवारी सकाळी वडील आईला मारहाण करत असताना, वडिलांनी आईला मारण्यासाठी उचललेला दगड मोठ्या मुलाने हिसकावून वडिलांच्याच डोक्यात घातला. यामुळे वडील जागीच गतप्राण झाले. या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मुलास अटक केली आहे. 

कृषी नगरात भाड्याने खोली करून राहणाऱ्या मायाबाई किशोर पाईकवार यांच्या तक्रारीनुसार त्या मंगरूळपीर तालुक्यातील इचोरी गावच्या राहणाऱ्या आहेत. त्यांचे पती किशोर विश्राम पाईकवार(40) दररोज दारू पिऊन घरी यायचे मुलांना व पत्नीला मारहाण करायचे. दररोजच्या त्रासाला कंटाळून माया पाईकवार यांनी वर्षभरापूर्वीच गाव सोडले आणि त्या दोन मुलांना घेऊन अकोल्यातील कृषी नगरात राहण्यास आल्या. परंतु या ठिकाणीही पती किशोर पाईकवार यांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. शनिवारी वडील दारू पिऊन घरी आले त्यांनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली. वडील आई व लहान भावास दगडाने मारहाण करीत असताना मोठा मुलगा जितेंद्र किशोर पाईकवार(19) याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु वडील ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने रागाच्या भरात त्याने वडिलांच्या हातातील दगड घेऊन त्यांच्या डोक्यावर मारला. यातच किशोर विश्राम पाईकवार(40) यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मुलांचे ठाणेदार भाऊराव घुगे पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. या ठिकाणी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी युवक जितेंद्र किशोर पाईकवार याला अटक केली आहे. रविवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. 

मुलाने केला पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
वडिलांच्या डोक्यावर दगड मारल्याने वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यामुळे घाबरलेल्या जितेंद्र पाईकवार याने त्याच्या मावस भावाला फोन करून घटनेची माहिती दिली. घरात पसरलेले रक्त त्याने पुसून काढले आणि ज्या दगडाने वडिलांना मारहाण करून हत्या केली तो दगड देखील त्याने पाण्याने धुऊन काढला व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पोलिसांनी पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा देखील दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक संदीप घुगे व ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात एपीआय पंकज कांबळे करीत आहेत.

रागाच्या भरात घडला गुन्हा
किशोर विश्राम पाईकवार हे सतत दारू पिऊन पत्नी व लहान मुलाला त्रास द्यायचे. शुक्रवारी सुद्धा ते दारू पिऊन आल्यावर त्यांनी पत्नी व लहान मुलास मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नी व लहान मुलाला दगड घेऊन मारहाण करण्यास धावले असता, मोठा मुलगा जितेंद्र बाईकवर याने वडिलांच्या हातातील दगड घेऊन, दगड त्यांच्या डोक्यात घातला. वडिलांच्या कृत्यामुळे राग अनावर झाल्याने त्यांना मारहाण केल्याचे जितेंद्र पाईकवार याने पोलिसांना सांगितले.
 

Web Title: The mother was troubled by husbands alcohol adiction, the son killed his father by throwing a stone on his head in a fit of anger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.