शहर स्वच्छतेसाठी महापालिका आयुक्त उतरले रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 11:54 PM2024-06-01T23:54:57+5:302024-06-01T23:55:08+5:30

आयुक्तांनी झाडले रस्ते, उचलली घाण : नागरिक, व्यावसायिकांची बघ्याची भूमिका.

 The municipal commissioner came down to the streets to clean the city |  शहर स्वच्छतेसाठी महापालिका आयुक्त उतरले रस्त्यावर

 शहर स्वच्छतेसाठी महापालिका आयुक्त उतरले रस्त्यावर

नितीन गव्हाळे,  अकोला : अकोला महानगरपालिकेच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली असून, १ जून रोजी सकाळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने यांनी महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह रस्त्यावर उतरून हाती खराटा घेऊन विविध भागात साफसफाई करीत सुमारे तीन तास श्रमदान केले. एवढेच नाहीतर त्यांनी स्वत: व कर्मचाऱ्यांनी रस्त्यांवरची घाण साफ केली.

महानगरपालिकेच्या वतीने शहरातील वर्दळीच्या, गर्दीच्या ठिकाणी तसेच शहरातील ज्या भागात जास्त प्रमाणात अस्वच्छता आहे अशा भागांमध्ये १ जून रोजी सकाळी ६ ते ८ वाजेदरम्यान मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रतनलाल प्लॉट, आंबेडकर नगर, एलआयसी ऑफिस, टॉवर चौक, महसूल कॉलनी, पत्रकार कॉलनी, जिल्हा मध्यवर्ती बँक, आर.एल.टी.कॉलेज समोरील रस्ता, सिव्हील लाईन चौक परिसर, नवीन बस स्टॅन्डजवळील भाग आदी भागात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून विशेष स्वच्छता मोहिमेंतर्गत या भागातील रस्ते, नाल्या आणि परिसरांची सखोल स्वच्छता करण्यात आली आहे, तसेच स्वच्छता झाल्यानंतर या भागातील सर्व नाल्यांमध्ये डास, अळी नाशक औषधीची फवारणी करण्यात आली आहे.

या विशेष स्वच्छता मोहिमेत मनपा उपायुक्त गीता ठाकरे, डॉ. मेघना वासनकर, शहर अभियंता नीला वंजारी, सहा.संचालक नगर रचना आशिष वानखडे, मनपा प्रशासन अधिकारी प्रमोद टेकाडे, सहा.आयुक्त विजय पारतवार, दिलीप जाधव, देविदास निकाळजे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोईफोडे, स्वच्छता विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर, शिवाजी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक विजय ठोकळ यांच्यासह सामाजिक संघटनांचे सदस्य, अशासकीय संस्थांचे सभासद, एनसीसी व एनएसएसचे विद्यार्थी, बचत गट, वस्ती स्तर संघ आदी सहभागी झाले होते.
 
प्लास्टिक वस्तुंचा वापर बंद करा, अन्यथा कारवाई

नागरिकांनी आपल्या घरात किंवा प्रतिष्ठानात निघणारा ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करून शहरात व परिसरात ईतरत्र तसेच नाली/नाल्यात न टाकता फक्त मनपाच्या कचरा घंटा गाडी मध्येच कचरा टाकावा, तसेच शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टीकने बनलेल्या वस्तूंचा वापर, विक्री व हाताळणी पूर्णपणे बंद करण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनील लहाने यांनी केले आहे.

Web Title:  The municipal commissioner came down to the streets to clean the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला