आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीचे नाव समजले, कारवाई होणार; गृहमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 07:23 AM2023-05-15T07:23:43+5:302023-05-15T07:24:12+5:30
ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी अकोल्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
अकोला : जुने शहरातील हरिहरपेठ परिसरात शनिवारी रात्री घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री, गृहमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी अकोल्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
रविवारी सकाळी ११ वाजता जुने शहर पोलिस ठाण्यात सर्वपक्षीय शांतता समितीची बैठक पार पडली. जुने शहर परिसरातील संचारबंदी व शहरातील तणावाचे वातावरण लक्षात घेता छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्तची शोभायात्रा व अन्य कार्यक्रम रद्द करण्यात आले. दुपारी पालकमंत्री फडणवीस यांचे प्रतिनिधी गिरीश महाजन यांनी परिस्थितीची माहिती घेतली. शांतता समितीच्या बैठकीनंतर अधिकाऱ्यांसह आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार नितीन देशमुख, आमदार अमोल मिटकरी आदींनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.
पोस्ट टाकणाऱ्यावर कारवाई करू!
समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीचे नाव समोर आले असून, संबंधित व्यक्तीवर निश्चितपणे कारवाई करण्यात येणार आहे. गरज पडल्यास या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचेही महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
एसआरपी, आरसीपीच्या तुकड्या तैनात
शहरातील जुने शहर भागात सशस्त्र पोलिस बल, राज्य राखीव पोलिस बलाच्या ४ तुकड्या आणि आरसीपीच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक, सहा. पोलिस निरीक्षक, पीएसआय, एएसआयसह वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा आणि हिंगोली येथील एक हजार पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे. दगडफेक, जाळपोळ करणाऱ्यांची गय केली जाणार नसून, सूत्रधारांचा शोध सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक घुगे यांनी सांगितले.