अकोलामार्गे धावणारी नांदेड-श्रीगंगानगर साप्ताहिक एक्सप्रेस होणार सुपरफास्ट
By Atul.jaiswal | Published: May 10, 2023 03:07 PM2023-05-10T15:07:51+5:302023-05-10T15:08:16+5:30
सद्या नांदेड-श्री गंगानगर-नांदेड एक्स्प्रेस १७६२३/१७६२४ या क्रमांकाने धावत आहे
अकोला : अकोला मार्गे नांदेड ते राजस्थानमधील श्री गंगानगर दरम्यान सुरु असलेली नांदेड-श्रीगंगानगर साप्ताहिक एक्सप्रेस येत्या २० जुलै पासून नव्या क्रमांकाने धावणार आहे. एवढेच नव्हे, तरी ही गाडी आता सुपरफास्ट दर्जाची होणार असल्याने गाडीचा वेग तर वाढेलच शिवाय तिकिटाचे दरही वाढणार आहेत.
सद्या नांदेड-श्री गंगानगर-नांदेड एक्स्प्रेस १७६२३/१७६२४ या क्रमांकाने धावत आहे. आगामी २० जुलैपासून नांदेडहून रवाना होणाऱ्या गाडीचा नवीन क्रमांक १७६२३ नांदेड-श्री गंगानगर असेल आणि श्रीगंगानगरहून नांदेडच्या दिशेने परतत असताना रेल्वेचा नवीन क्रमांक २२७२४ श्री गंगानगर-नांदेड असेल. गाडी क्र. २२७२३ /२२७२४ नांदेड-श्री गंगानगर - नांदेड एक्सप्रेस साप्ताहिक एक्स्प्रेसचे सुपर फास्ट एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करण्यात आल्याने रेल्वेचा वेग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. गाडी क्रमांक २२७२३ नांदेड - श्री गंगानगर नांदेड येथून दर गुरुवारी सकाळी ७ वाजता निघून दर शुक्रवारी सायंकाळी ७:१० वाजता श्री गंगानगर येथे पोहोचेल. परतीच्या दिशेने गाडी क्रमांक २२७२४ श्रीगंगानगरहून दर शनिवारी दुपारी २:१० वाजता सुटेल आणि दर रविवारी रात्री नांदेडला पोहचेल.
अकोलाच्या वेळेत बदल नाही
२० जुलैपासून नवीन क्रमांकाने धावणारी साप्ताहिक विशेष गाडी नांदेड येथून सकाळी ६.५० ऐवजी ७ वाजता रवाना होणार असली तरी ही गाडी अकोल्यात येण्याच्या वेळेत मात्र कोणताही बदल नसेल. ही गाडी आताप्रमानेच सकाळी ११:४० वाजता अकोला स्थानकावर पोहोचेल. परतीच्या प्रवासात २२ जुलैनंतर ही गाडी अकोल्यात रात्री ९:२० वाजता पोहाेचून ९:३० वाजता नांदेडकरीता रवाना होईल.