अकोल्यात ‘लम्पी’चा फास घट्ट; दोन जनावरांचा मृत्यू, ५३२ जनावरांना लागण
By रवी दामोदर | Published: September 10, 2022 06:22 PM2022-09-10T18:22:18+5:302022-09-10T18:27:22+5:30
पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण: ५३२ जनावरांना लागण
रवी दामोदर
अकोला : जिल्ह्यामध्ये लम्पी चर्मरोग या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून, सध्यास्थिती लम्पीचा फास घट्ट होत असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांत दोन गुरांचा मृत्यू झाल्याने पशुपालकांसह पशुसंवर्धन विभाग चिंतित सापडला आहे. दि.१० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ५३२ जनावरांना लागण झाली असून, पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हाभरात जनजागृतीसह लसीकरण करण्यात येत आहे. सध्यास्थितीत सातही तालुक्यांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यात पशुसंवर्धन विभागाच्या जागा रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांची अडचण वाढली आहे. लम्पीमुळे झालेल्या दोन मृत्यूंमध्ये एक तेल्हारा तालुक्यात, तर दुसरा बाळापूर तालुक्यात मृत्यू झाला आहे.
लम्पीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, पशुपालकांची चिंता वाढली आहे. या आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माश्या, डास, गोचीड, चिलटे यांच्या मार्फत होतो. तसेच या आजाराचा प्रसार निरोगी आणि बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होऊ शकतो. त्यामुळे पशुपालकांची आणखी डोकेदुखी वाढली आहे. सध्य:स्थितीत ५३२ पशू रुग्ण उपचाराधीन असून, बाधित गावांतील ११ हजार ६६० पशुधन धोक्यात आले आहे. दुसरीकडे, पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरण करण्यात येत आहे. जिल्हाभरात लम्पीचा फास घट्ट होत असून, दोन गुरांचा मृत्यू झाल्याने पशुपालकांच्या चिंता वाढल्या आहेत.
३९५२३ जनावरांचे लसीकरण पूर्ण
जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असला, तरी पशुसंवर्धनविभाग अलर्टमोडवर आहे. जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरण करण्यात येत आहे. दरम्यान, १० सप्टेंबरपर्यत जिल्ह्यातील ३९ हजार ५२३ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले होते. दुसरीकडे पशुसंवर्धन विभागातील अनेक पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे.
सातही तालुक्यात प्रादुर्भाव, पशुपालक चिंतित
अकोला जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव आता सातही तालुक्यात पोहोचला आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यात लम्पीचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पशुसंवर्धन विभागासह पशुपालकांची चिंता वाढली आहे.