नर्सला नागपूरला जाणे ५६ हजारांत पडले, चोरट्यांनी घर फोडले
By नितिन गव्हाळे | Published: August 27, 2023 09:17 PM2023-08-27T21:17:11+5:302023-08-27T21:21:19+5:30
कौलखेडात घर फोडले, चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल
नितीन गव्हाळे
अकोला: जिल्हा स्त्री रूग्णालयातील अधिपरिचारिकेला नागपूर येथे प्रशिक्षणाला जाणे चांगलेच महागात पडले. २३ ते २५ ऑगस्टदरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरातील दरवाजाचा कडीकोयंडा व कुलूप तोडून घरातील रोख ३५ हजार, २६ ग्रॅमचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणात खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
स्त्री रुग्णालयात अधिपरिचारिका पदी कार्यरत सुनंदा गजानन भाकरे (५०) यांच्या तक्रारीनुसार त्या बलोदे लेआऊटमध्ये राहत असून, आरोग्य अंतर्गत प्रशिक्षणासाठी त्या २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान नागपूर येथे गेल्या होत्या. २५ ऑगस्ट रोजी त्यांचे भाडेकरू दौलत वसंतराव मुंडे यांनी मोबाईल फोनद्वारे चोरी झाल्याची माहिती दिली. सुनंदा भाकरे यांनी घरी पाहणी केली असता, घराचे कंपाऊंडचे कुलूप कापलेले दिसले. तसेच घरातील किचन आणि हाॅलमधील देव घरातील चांदीचे शिक्के, करंडे आणि बेडरूममधील कपाटातून नगदी रक्कम ३५ हजार रूपये व २६ ग्रॅमचे सोन्याचे दागिने असा एकूण ५६ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणात खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.