वंचित-रिपाइं एकत्र आल्यास महाराष्ट्राचे राजकारण बदलणार!

By संतोष येलकर | Published: January 15, 2024 09:43 PM2024-01-15T21:43:46+5:302024-01-15T21:43:55+5:30

रामदास आठवले यांचा बाळासाहेब आंबेडकर यांना टाळी देण्याचा प्रयत्न

The politics of Maharashtra will change if VBA and RPI comes together | वंचित-रिपाइं एकत्र आल्यास महाराष्ट्राचे राजकारण बदलणार!

वंचित-रिपाइं एकत्र आल्यास महाराष्ट्राचे राजकारण बदलणार!

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) एकत्र येण्याची गरज असून, आम्ही एकत्र आलो तर महाराष्ट्राचे राजकारण बदलणार असून, राज्याचा मुख्यमंत्री आमचा झाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना टाळी देण्याचा प्रयत्न सोमवारी अकोल्यात केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अकोला जिल्ह्याच्या वतीने अकोला शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात आयोजित गायरान जमीन अतिक्रमण हक्क परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

ॲड. बाळासाहेब आंबेडकर महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असून, त्यांचा मला आदर आहे. मागासवर्गीय, ओबीसी, बहुजन अशा वेगवेगळ्या घटकांसाठी लढा देत त्यांना एकत्र करण्याचे कार्य बाळासाहेब आंबेडकर करीत असल्याचे गौरवोद्गार काढत आम्ही सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आठवले यांनी सांगितले. चळवळ मजूबत करायची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रिपाइं (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनील अवचार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गायरान जमीन अतिक्रमण हक्क परिषदेला पक्षाचे प्रदेश संघटन सचिव अशोक नागदेवे, सुमित वजाडे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष मोहन भोयर, जिल्हा महासचिव जे.पी. सावंग, अमरावती जिल्हाध्यक्ष प्रकाश बनसोड, महेंद्र मानकर, प्रकाश गजभिये आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आकाश हिवराळे यांनी केले.

अकोला जिल्हा पुन्हा रिपब्लिकनमय करायचा आहे!
दलित पँथरच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यात अनेक आंदोलने करण्यात आली होती. आम्हाला पुन्हा हा जिल्हा रिपब्लिकनमय करायचा आहे, असा निर्धार रामदास आठवले यांनी यावेळी बोलून दाखविला. अकोला जिल्ह्यात ‘जय भीम’चा नारा बुलंद करणारे कार्यकर्ते असल्याचेही त्यांनी सांगितले.

बाबासाहेबांच्या संविधानाला कोणालाही हात लावता येणार नाही !
महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला कोणालाही हात लावता येणार नाही. संविधान बदलणे शक्य नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान बदलणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करीत भीमशक्ती संविधान बदलू देणार नाही, असे आठवले यांनी सांगितले.

२२ जानेवारीला अयोध्येला जाणार !

येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील श्री राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले असून, आपण अयोध्येला जाणार असल्याचे सांगत, बुद्धविहारांमध्ये स्वच्छतेची कामे राबविण्याचे आवाहनही आठवले यांनी यावेळी केले.

Web Title: The politics of Maharashtra will change if VBA and RPI comes together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.