लोकमतचा दणका; अखेर एसटीतून सेवानिवृत्त झालेल्या अभियंत्याची बढती रद्द
By Atul.jaiswal | Published: September 21, 2022 06:17 PM2022-09-21T18:17:03+5:302022-09-21T18:17:58+5:30
व्यवस्थापकीय संचालकांनी काढला सुधारित आदेश
अकोला : राज्य परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागातून ३० जून २०२२ रोजी सेवानिवृत्त झालेल्या एका कनिष्ठ अभियंत्यास (स्थापत्य) वर्धा विभागात विभागीय अभियंता (स्थापत्य) पदावर तात्पुरती बढती देण्याचा प्रताप राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी केला होता. 'लोकमत'ने हा प्रकार चव्हाट्यावर आणताच उपरती झालेल्या व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने त्या अभियंत्याला बढती देण्याचा निर्णय २१ सप्टेंबर रोजी सुधारित आदेश काढून रद्द केला.
नागपूर विभागीय कार्यालयात कनिष्ठ अभियंता अधिकारी वर्ग २ (कनिष्ठ) स्थापत्य शाखा पदावर कार्यरत असलेले नरेश देवराव पाटील हे ३० जून २०२२ रोजी ५८ वर्षांचे झाल्याने त्यांना त्याच दिवसापासून त्यांचे नाव स्थापत्य शाखेच्या हजेरी पटावरून तसेच नागपूर विभागाच्या संख्याबळावरून कमी करण्याचे आदेश नागपूर विभाग नियंत्रकांनी ४ जून २०२२ रोजी काढले होते.
या आदेशानुसार ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या नरेश देवराव पाटील यांना वर्धा विभागात विभागीय अभियंता (स्थापत्य) पदावर तात्पुरती बढती देण्याचा आदेश राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी १९ सप्टेंबर रोजी काढला. सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यास मागच्या दाराने तात्पुरती बढती देऊन पुन्हा सेवेत घेण्याचा प्रकार 'लोकमत'ने २१ सप्टेंबरच्या अंकात उघडकीस आणताच व्यवस्थापकीय संचालकांनी त्याच दिवशी सुधारित आदेश काढून त्या अभियंत्याच्या बढती देण्याचा आपलाच आदेश रद्द केला.