'पोलिसांनी लोकाभिमूख कार्यातून जनतेचे सेवक बनावे, प्रत्येक नागरिकाला न्याया द्यावा'
By नितिन गव्हाळे | Published: October 7, 2022 01:32 PM2022-10-07T13:32:19+5:302022-10-07T13:36:59+5:30
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस: नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाचे थाटात लोकार्पण
अकोला: अकोला पोलीस दलाला सुसज्ज आणि भव्यदिव्य पोलीस अधीक्षक कार्यालय मिळाले आहे. या कार्यालयातून पारदर्शी कारभार व्हावा. लोकाभिमुख पद्धतीने काम करीत,जनतेचे सेवक म्हणून पोलिसांनी काम करावे. संविधानाने दिलेल्या कायद्याचे रक्षण करून कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा. तरच या नव्या इमारतीची भव्यता व दिव्यता वाढेल. अशी अपेक्षा राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली.
सिंधी कॅम्प परिसरातील अकोला पोलीस दलाच्या नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाचे ७ ऑक्टोबर रोजी ११.३० वाजता लोकार्पण करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, माजी गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार प्रकाश पाटील भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, शिक्षक आमदार ॲड. किरण सरनाईक, माजी आमदार बळीराम सिरस्कार, माजी महापौर अर्चना मसने, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा, जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, पोलीस उपअधीक्षक रितु खोकर, आर्कीटेक्ट सोहेल खान आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री असताना, मी अकोल्यातील नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीच्या प्रस्ताव मंजूर केला. आता या नवीन इमारतीमधून पारदर्शी कारभारासोबतच कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण होऊन त्यांना न्याय मिळणे अपेक्षित आहे. आताचे पोलीस दल हे इंग्रजकाळातील नाहीत. जनतेचे सेवक म्हणून त्यांनी काम करावे आणि कामाची पद्धत लोकाभिमुख करावी. असा सल्लाही त्यांना पोलिसांना दिला.
दरम्यान, कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केले. आभार अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी मानले. कार्यक्रमाला भाजपचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, ॲड. मोतीसिंह मोहता, हरिश आलिमचंदानी, जयंत मसने, सागर शेगोकार, आशिष पवित्रकार आदी उपस्थित होते.