बातमी अन् वाचक हाच ‘लोकमत’चा आत्मा - विजय दर्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2022 11:12 AM2022-06-21T11:12:29+5:302022-06-21T11:14:23+5:30

Vijay Darda : लोकमत नागपूर आवृत्तीचा सुवर्ण महोत्सव व लोकमत अकोला आवृत्तीच्या रौप्य महोत्सवानिमित्त वितरक, वार्ताहरांचा कृतज्ञता सोहळा व कर्तृत्ववान महिलांच्या गौरव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

The reader of the news is the soul of 'Lokmat' - Vijay Darda | बातमी अन् वाचक हाच ‘लोकमत’चा आत्मा - विजय दर्डा

बातमी अन् वाचक हाच ‘लोकमत’चा आत्मा - विजय दर्डा

Next
ठळक मुद्देलोकमत नागपूर आवृत्ती सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा गौरव

अकोला : लोकमतने सातत्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नांना, समस्यांना वाचा फोडली आहे. शोषित, पीडित, वंचितांना न्याय मिळवून दिला आहे. पत्रकारिता परमो धर्म मानत, सत्य आणि विश्वासार्हताही कायम राखली. लोकमत सर्वांसाठी आहे. हे लोकांचे वृत्तपत्र आहे, लोकांसाठी समर्पित आहे, बातमी अन् वाचक हाच ‘लाेकमत’चा आत्मा असल्यामुळेच देशातील क्रमांक १ चे दैनिक म्हणून नावारूपाला आले आहे, असे प्रतिपादन लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी केले. लोकमत नागपूर आवृत्तीचा सुवर्ण महोत्सव व लोकमत अकोला आवृत्तीच्या रौप्य महोत्सवानिमित्त वितरक, वार्ताहरांचा कृतज्ञता सोहळा व कर्तृत्ववान महिलांच्या गौरव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला व्यासपीठावर आमदार वसंत खंडेलवाल, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, लोकमत अकोला आवृत्तीचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल, नागपूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र आणि लोकमत अकोला आवृत्तीचे युनिट हेड आलोककुमार शर्मा उपस्थित होते.

‘लोकमत’ सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व माजी मंत्री लोकमतचे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांचे स्मरण करणे अगत्याचे आहे. लोकमतचा सुरुवातीचा प्रवास अत्यंत खडतर, संघर्षाचा होता. परंतु ‘पत्रकारिता परमो धर्म’ जोपासत उपेक्षित, पीडित, शोषितांसह शेतकरी, तरुण, महिलांच्या समस्यांवर काम सुरू केले, त्याला वाचा फोडली, असे सांगत विजय दर्डा यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत लाेकमतचा इतिहास उलगडला. देशातच प्रथमच टेक्नॉलॉजीचा वापर केला. देशात फोर कलर प्रिंटिंग केवळ लोकमतने आणली. वार्ताहर, एजंटांचे जाळे विणले. ‘जेथे बातमी - तेथे लोकमत’, ‘जेथे एसटी - तेथे लोकमत’ असे समीकरण झाले. लोकांच्या विकासासाठी, त्यांच्या समस्यांसाठी लोकमत भांडू लागला. भ्रष्टाचारावर आसूड ओढले. कोणताही पक्षभेद न करता, वाचकांचे वृत्तपत्र बनले. त्यामुळेच लोकमत लोकांसाठी समर्पित आहे असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संपादक किरण अग्रवाल यांनी केले. सूत्रसंचालन लोकमतचे उप वृत्त संपादक राजेश शेगाेकार यांनी केले. आभार लोकमत समाचारचे प्रभारी अरुणकुमार सिन्हा यांनी मानले.

स्वातंत्र्यचळवळीत लोकमतचे योगदान

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १९१८ ‘लाेकमत’ हे नाव दिले आणि या साप्ताहिकाने स्वातंत्र्यलढयात चेतना जागविली. कालांतराने हे साप्ताहिक बंद पडले, पुढे १९४२ मध्ये जवाहरलालजी दर्डा यांनी हे साप्ताहिक सुरू केले. नंतर १९७१ मध्ये नागपुरातून लोकमत दैनिकाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली आज लाेकमतचा वटवृक्ष झाला आहे असा उल्लेखही विजय दर्डा यांनी केला.

 

‘लोकमत’ला सुवर्णकाळ देणाऱ्यांचा गौरव

लोकमत नागपुर आवृत्ती सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना, ‘लोकमत’च्या स्थापनेपासूनच एजंट व वार्ताहरांचा लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यात अकोल्यातील प्रा. सुभाष गादिया, राकेश पुरोहित, एजंट अशोकराव देशमुख, पातूरचे शंकरराव नाभरे, मूर्तिजापूरचे दीपक अग्रवाल, उरळचे वार्ताहर व एजंट रामदास उगले गुरुजी, व्याळाचे ज्येष्ठ एजंट डी. एन. गिऱ्हे, जामठीचे प्रा. पी. एन. बोळे गुरुजी, कुरूमचे धीरेंद्र निराळे, आलेगावचे अब्दुल कादिर, छायाचित्रकार विनय टोले आदींचा समावेश आहे.

 

लोकमतच सरकार- लक्ष्मणराव तायडे

आज ‘लोकमत’ची पताका महाराष्ट्रातच नव्हेतर दिल्लीपर्यंत फडकत आहे. लोकमत हे लोकांचे मत आहे. लोकमत खडतर व संघर्ष करीत, देशात क्रमांक १ चे दैनिक होण्याचा मान मिळविला असे सांगत, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांनी श्रद्धेय बाबुजींच्या सहवासातील काही आठवणींना उजाळा दिला. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना, त्यांनी काही कारणास्तव लोकमतच्या जाहिराती बंद केल्या. परंतु, लोकमतने हार मानली नाही. परिश्रमाने लोकमतने वाचकांच्या मनावर अधिराज्य मिळविले त्यावेळी बाबुजींनी लाेकमत हेच सरकार आहे असे ठणकावून सांगीतले हाेते असेही तायडे म्हणाले.

माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी लोकमतने शोषित, पीडित, वंचितांना न्याय देण्याचे काम केले. राजकारण्याच्या कार्यपद्धतीचा प्रहार केले. अनेक राजकीय नेते वठणीवर आणण्याचे काम केले मात्र टीका करताना लाेकमतने कधीही आपला दर्जा साेडला नाही, हे आवर्जून सांगितले.

 

कृषी क्षेत्र विकासासाठी लोकमतचे योगदान- कुलगुरू भाले

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. विलास भाले म्हणाले की, लोकमतच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आगळावेगळा कार्यक्रम पाहायला मिळाला. विदर्भात कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केले. त्यावेळी विद्यापीठाने बोंडअळी नियंत्रणासाठी केलेल्या कार्याला लोकमतने बळ दिले. यासोबतच शेतकऱ्यांच्या समस्या, कृषीविषयक जनजागृती लोकमतने केली. कृषी क्षेत्र विकासासाठी लोकमतने माेठे योगदान दिले असल्याचा उल्लेख डॉ. भाले यांनी केला.

Web Title: The reader of the news is the soul of 'Lokmat' - Vijay Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.