अकोला विमानतळाच्या नूतनीकरणाचे सात महिन्यांत पूर्ण होणार काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 01:52 PM2022-02-12T13:52:17+5:302022-02-12T13:54:33+5:30
Akola Airport : अकोला विमानतळाच्या नूतनीकरण कामासाठी येत्या दहा दिवसात प्राधिकरणामार्फत निवीदा प्रक्रिया सुरू होणार.
अकोला : अकोल्याच्या शिवनी विमानतळ नूतनीकरणाचे काम सुरू करण्यासाठी येत्या दहा दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू होणार असून, विमानतळ नूतनीकरणाचे काम येत्या सात महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे, अशी ग्वाही भारतीय विमान पत्तन प्राधिकरणचे चेअरमन संजीव कुमार यांनी शुक्रवारी दिल्ली येथील बैठकीत आमदार वसंत खंडेलवाल यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळासोबत चर्चेदरम्यान दिली. अकोला विमानतळाच्या नूतनीकरण कामासाठी भारतीय विमान पत्तन प्राधिकरणामार्फत ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ११ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे प्राधीकरणामार्फत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विमान पत्तन प्राधिकरणाचे संबंधित अधिकारी आणि आमदार वसंत खंडेलवाल यांच्यासह माजी महापौर विजय अग्रवाल, भाजपाचे उत्तर भारतीय आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष रामप्रकाश मिश्रा उपस्थित होते. अकोला विमानतळाच्या नूतनीकरण कामासाठी येत्या दहा दिवसात प्राधिकरणामार्फत निवीदा प्रक्रिया सुरू होणार असून, नूतनीकरणाचे काम सात महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे विमान पत्तन प्राधिकरणाचे चेअरमन संजीव कुमार यांनी यावेळी आ. खंडेलवाल यांच्यासह शिष्टमंडळाला सांगितले.
विमानतळाच्या नूतनीकरणातही कामे केली जाणार !
() विमानतळाची धावपट्टी अद्ययावत करणार.
() विमानतळाची नवीन इमारत बांधणार.
() आवश्यक मनुष्यबळ कार्यान्वित करणार.
() आवश्यक साहित्य उपलब्ध करणार.
निधी कमी पडू देणार नाही; विमान वाहतूक मंत्र्यांची ग्वाही !
अकोला विमानतळाचे नूतनीकरण करण्याच्या मुद्द्यावर आ. वसंत खंडेलवाल यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचीही भेट घेऊन चर्चा केली. अकोला विमानतळ नूतनीकरणाच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. काम सुरू झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास आणखी निधी देण्यात येणार आहे. नूतनीकरणाच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांनी दिली. असेच आश्वासन भारतीय विमान पत्तन प्राधिकरणाचे चेअरमन संजीव कुमार यांनीसुद्धा शिष्टमंडळाला दिले.
..................फोटो..............................