‘त्या’ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षकांचीच! बॉन्डवर हमीपत्र दिल्यानंतरच आता सहलीला परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 10:20 IST2024-12-01T10:20:21+5:302024-12-01T10:20:46+5:30

सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही संबंधित शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकांचीच राहणार आहे. 

The responsibility of the safety of 'those' students belongs to the principal and teachers! Now the trip is allowed only after the bond is given | ‘त्या’ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षकांचीच! बॉन्डवर हमीपत्र दिल्यानंतरच आता सहलीला परवानगी

‘त्या’ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षकांचीच! बॉन्डवर हमीपत्र दिल्यानंतरच आता सहलीला परवानगी

अकोला : नागपूर येथे शालेय विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. प्राथमिक व माध्यमिक विभाग सतर्क झाला असून, विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही संबंधित शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकांचीच राहणार आहे. 

सध्या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये जिल्ह्यातील अनेक शाळा-महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहली निघतात. त्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सच्या बस भाड्याने घेण्यात येतात. विद्यार्थ्यांना सहलीला नेताना नियमांचे पालन कोणी करताना दिसत नाही. एखादी अनुचित घटना घडल्यास, त्याची जबाबदारी घ्यायला प्राचार्य, मुख्याध्यापक आणि शिक्षक तयार होत नाहीत. सहलीला जाण्यापूर्वी पालकांचे संमतीपत्र लिहून घेताना, त्यात विद्यार्थ्याच्या सुरक्षेची जबाबदारी ही त्याचीच असेल, त्याला शाळा जबाबदार राहणार नाही, असे शाळा व्यवस्थापनाकडून नमूद केले जाते. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने नियमांचे परिपत्रक काढून, सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही मुख्याध्यापक, शिक्षकांचीच असून, शाळांनी बॉन्डवर हमीपत्र दिल्यानंतर सहलीला परवानगी देण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

या अटी व शर्तींचे पालन केले, तरच परवानगी

एका वर्षात एकच शैक्षणिक सहल आयोजित करण्यात यावी, सहलीला येण्याची सक्ती करण्यात येऊ नये, विद्यार्थी आणि पालकांचे संमतीपत्र घेण्यात यावे, सहभागी विद्यार्थ्यांची यादी व संपर्क क्रमांक सोबत संलग्न करण्यात यावा,  शाळा व्यवस्थापन समिती, शाळा समिती यांच्या संमतीचे ठराव घेऊनच सहलीचे आयोजन करावे, सहलीसाठी १० विद्यार्थ्यांसाठी एक या प्रमाणात शिक्षकांची संख्या असावी, विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची सर्व जबाबदारी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांची राहील, विद्यार्थिनींचा सहभाग असल्यास महिला शिक्षिका सोबत असणे अत्यावश्यक, सहल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसनेच नेण्यात यावी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी जादा शुल्क आकारू नये, सहल जाणाऱ्या ठिकाणी शासकीय रुग्णालयाचे संपर्क क्रमांक सोबत असावे.

शाळांनी शैक्षणिक सहल नेताना शिक्षण विभागाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाचे बुकिंग असेल, बॉन्डवर हमीपत्र दिल्यानंतर परवानगीचा विचार केला जाईल. अपघात झाल्यास, विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका झाल्यास, त्याची जबाबदारी शिक्षक, मुख्याध्यापकांची राहणार आहे.      - रतनसिंग पवार, शिक्षणाधिकारी प्राथमिक

Web Title: The responsibility of the safety of 'those' students belongs to the principal and teachers! Now the trip is allowed only after the bond is given

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.