घरात दडलेला घोणस करत होता कुकरच्या शिटीसारखा आवाज, सर्पमित्राने कुटुंब केले भयमुक्त
By Atul.jaiswal | Published: August 26, 2023 01:25 PM2023-08-26T13:25:20+5:302023-08-26T13:25:38+5:30
घोणस हा अत्यंत रागीट व आक्रमक साप असतो. काळणे यांनी मोठ्या शिताफीने दडून बसलेल्या घोणसला पकडले व घराबाहेर आणले.
- अतुल जयस्वाल
अकोला : बाळापूर तालुक्यातील गायगाव येथील एका रहिवाशाच्या घरात रात्री घुसलेल्या घोणस या अत्यंत जहाल विषारी सापाला पकडून मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी कुटुंबाला भयमुक्त केल्याची घटना शनिवारी (२६ ऑगस्ट) सकाळी घडली.
गायगाव येथे मोहन पाठक नामक व्यक्तीचे घर आहे. शनिवारी सकाळी त्यांच्या घरात विषारी घोणस सापाने प्रवेश केला. घोणस करत असलेल्या कुकरच्या शिटीसारखा फुत्कार टाकत असल्याचे पाहून त्यांच्या घरातील सदस्य भयभीत झाले. पाठक यांच्या घरात साप घुसल्याचे समजताच शेजारी धावून आले. परंतु, घोणस असल्याचे पाहून कोणीही हिंमत केली नाही. गावातील सुनील आगरकर व श्याम वडतकर यांनी सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांना कळविले. माहिती मिळताच बाळ काळणे यांनी गायगाव गाठले. घरातील एका कोपरऱ्यात दडून बसलेला घोणस फुत्कार टाकत असल्याचे काळणे यांना दिसले.
घोणस हा अत्यंत रागीट व आक्रमक साप असतो. काळणे यांनी मोठ्या शिताफीने दडून बसलेल्या घोणसला पकडले व घराबाहेर आणले. त्यानंतर घोणसला सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. थंडीच्या दिवसात घोणस आढळण्याचे प्रमाण जास्त असते. नदी - नाल्याजवळील, शेताजवळील घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, असे आवाहन यावेळी बाळ काळणे यांनी केले.