अकोल्याच्या ‘शंतनू’च्या तबल्याचा नाद अयोध्या मंदिरात निनादणार
By नितिन गव्हाळे | Published: January 18, 2024 09:26 PM2024-01-18T21:26:14+5:302024-01-18T21:26:20+5:30
भुतो न भविष्यती सोहळा अनुभवण्याची संधी, दिग्गज कलावंतांसोबत करणार साथसंगत
अकोला:अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी भव्य मंदिरात प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा भव्यदिव्य सोहळा असून, या सोहळ्यासाठी जगभरातून दिग्गज कलावंत जात आहेत. १९ जानेवारीपासून विविध कार्यक्रम होणार आहेत. यात मंगलध्वनी या कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या समारंभात सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि शंकर महादेवन यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमात अकोल्यातील शंतनू नरेंद्र मायी हे तबल्याची साथ करणार आहेत.
त्यामुळे अयोध्या मंदिराच्या गाभाऱ्यात शंतनूच्या तबल्याचा स्वर निनादणार आहे.अयोध्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा समारोहात विविध राज्यातील मंगलवाद्यांचे वादन होणार आहे. त्यानुसार संगीत नाटक अकादमी दिल्ली यांचे या कामाकरिता सहकार्य घेण्यात येणार आहे. अकादमीने निवडक कलावंतांची मंगलध्वनी कार्यक्रमासाठी निवड केली.
त्यात महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. त्यात अकोला येथील शंतनू नरेंद्र मायी या तबला वादकाला श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे निमंत्रण प्राप्त झाले आहे. शंतनू हे श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी म्हणजे २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध गायिका आशा भोसले, अनुराधा पौडवाल तथा शंकर महादेवन् यांना तबल्याची साथ देणार आहेत. देशातील संगीत क्षेत्रात प्राविण्य प्राप्त एकूण ३१ जणांची चमू 'मंगलध्वनी' या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
शंतनु करतो तिसऱ्या वर्षांपासून तबला वादन
शंतनू हा वयाच्या तिसऱ्या वर्षापासून तबला वादन करतात. बारा वर्षापासून तो पंडित योगेश समसी यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत. ऑल इंडिया रेडिओचे तो ए ग्रेड आर्टिस्ट आहे. यापूर्वी त्याने पंडित अजय पोहनकर, सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्यासारख्या दिग्गज गायकांसोबत साथ-संगत केली आहे. वाणिज्य पदवीनंतर त्याने कायद्याची पदवी प्राप्त केली असून, विविध शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. अयोध्या येथील सोहळ्यासाठी त्यांची झालेली निवड ही अकोलेकरांसाठी गौरवाची बाब आहे.