अकोला : कोविड फैलावाचा वेग वाढतोय; दिवसभरात सहा पॉझिटिव्ह!
By राजेश शेगोकार | Published: March 30, 2023 07:05 PM2023-03-30T19:05:08+5:302023-03-30T19:05:15+5:30
कोविड फैलावाची गती वाढू लागली आहे. गुरुवारी दिवसभरात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
अकोला - जिल्ह्यात कोविड फैलावाची गती वाढू लागली आहे. गुरुवारी दिवसभरात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे. शिवाय, लक्षणे दिसून येत असल्यास डॉक्टरांना दाखवा. तसेच मास्कचा वापर करण्याचा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जात आहे. गुरुवारी प्राप्त अहवालानुसार, सहा जणांचे अहवाल कोविड पॉझिटिव्ह आले.
रुग्णांमध्ये चार पुरूष व दोन महिलांचा समावेश आहे. यातील तीन रुग्ण मूर्तिजापूर तालुक्यातील, तर तीन रुग्ण महापालिका क्षेत्रातील रहिवासी आहेत. दरम्यान, तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या २१वर पोहोचली आहे. कोविड रुग्ण संख्या वाढीचा वेग गत आठवड्यात वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेमार्फत केले जात आहे. मास्कचा वापर करण्यासोबतच नागरिकांनी कोविड काळातील त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले जात आहे.
रुग्णालयात ६ रुग्ण, १५ रुग्ण गृहविलगीकरणात
जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे २१ रुग्ण सक्रिय आहेत. त्यापैकी ६ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर उर्वरित १५ रुग्ण गृहविलगीकरणात असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात आली.