बारा गुंडांना तडीपार केल्याचे पोलिस अधीक्षकांचे आदेश कायम, गुन्हेगारांनी केले होते विभागीय आयुक्तांकडे अपील
By नितिन गव्हाळे | Published: May 9, 2024 09:19 PM2024-05-09T21:19:03+5:302024-05-09T21:20:58+5:30
या आदेशाविरुद्ध तडीपार गुंडांनी विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडे अपील दाखल केले होते. विभागीय आयुक्तांनी पोलिस अधीक्षकांचे दोन वर्षांकरिताचे तडीपारचे आदेश कायम ठेवले आहेत.
अकोला : शहरातील अकोट फैलातील दोन गुंड आणि ईराणी झोपडपट्टीतील १० गुंडांना पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांनी तडीपार करण्याचे आदेश जून २०२२ व सप्टेंबर २०२३ रोजी दिले होते. या तडीपारच्या आदेशाला गुंडांनी विभागीय आयुक्त अमरावती येथे आव्हान दिले होते. विभागीय आयुक्त निधी पांडेय यांनी सुनावणी करीत, पोलिस अधीक्षकांचा आदेश कायम ठेवला.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टिकोनातून पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांनी अकोट फैल हद्दीतील शेख सोहेल शेख युसुफ (२८, रा. भारतनगर), शेख रेहान कुरेशी युसुफ कुरेशी (२४, रा. सोळाशे प्लॉट, अकोट फैल) आणि सिटी कोतवाली हद्दीतील राणी औलाद हुसैन (४५, रा. इराणी झोपडपट्टी) हिच्यासह ९ गुंडांना सप्टेंबर २३ व जून २०२२ मध्ये दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले होते.
या आदेशाविरुद्ध तडीपार गुंडांनी विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडे अपील दाखल केले होते. विभागीय आयुक्तांनी पोलिस अधीक्षकांचे दोन वर्षांकरिताचे तडीपारचे आदेश कायम ठेवले आहेत.
दोन टोळ्या एक वर्षासाठी तडीपार
टोळीने गुन्हे करणाऱ्यांना प्रतिबंध बसावा यासाठी जुने शहर हद्दीतील महेश चंद्रकांत घाटोळे (२६), गौरव उर्फ गोलू चंद्रकांत घाटोळे (३६, रा. नाईकवाडीपुरा), शिवाजीनगर आणि अकोट ग्रामीण पो.स्टे. हद्दीतील गुन्हेगार रूपराव रामराव लासुरकर (४४), गोपाल सुरेश अढाऊ (२४), गोपाल मनोहर सदाफळे (३२, रा. बेलखेड, ता. तेल्हारा) यांच्यावरील गुन्हे पाहता त्यांना पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.