पावसाची दांडी; मजुरांच्या हाताला ‘रोहयो’ कामांचा आधार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 02:36 PM2024-06-26T14:36:39+5:302024-06-26T14:37:27+5:30

जिल्ह्यात २,०३४ कामांवर १२,२९८ मजुरांची उपस्थिती

The support of Rohyo works in the hands of laborers | पावसाची दांडी; मजुरांच्या हाताला ‘रोहयो’ कामांचा आधार!

पावसाची दांडी; मजुरांच्या हाताला ‘रोहयो’ कामांचा आधार!

संतोष येलकर, अकोला : यंदाचा पावसाळा सुरू होऊन २४ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र सार्वत्रिक दमदार पावसाने दांडी मारल्याने, जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणी खोळंबली आहे. शेतीची कामे ठप्प असल्याच्या परिस्थितीत पावसाळ्यातही जिल्ह्यातील ग्रामीण भागात सद्य:स्थितीत सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या (रोहयो) २ हजार ३४ कामांवर १२ हजार २९८ मजुरांची उपस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मजुरांच्या हाताला रोहयो कामांचा आधार मिळत असल्याचे वास्तव आहे. यंदाच्या पावसाळ्यात गेल्या ११ जून रोजी जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस बरसला. त्यानंतर मात्र अधूनमधून तुरळक पावसाच्या सरी बरसत असल्या, तरी सार्वत्रिक दमदार पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे जिल्ह्यात खरीप पेरणी रखडली असून, सार्वत्रिक दमदार पावसाची सर्वत्र प्रतीक्षा केली जात आहे.

शेतीची कामे ठप्प असल्याने, ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळेनासे झाल्याने मजुरांना रोजगार हमी योजनेच्या कामाशिवाय पर्याय उरला नाही. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायती आणि विविध यंत्रणांमार्फत सद्य:स्थितीत सुरू असलेल्या विविध २ हजार ३४ कामांवर १२ हजार २९८ मजूर काम करीत आहेत.
 
तालुकानिहाय सुरू असलेल्या
कामांची अशी आहे संख्या !
तालुका कामे
अकोला ३८९
अकोट २२२
बाळापूर २७०
बार्शीटाकळी २८४
मूर्तिजापूर ४७४
पातूर १७४
तेल्हारा २२१
 
पावसाळ्यातही कामांची
मागणी वाढती !
पावसाळा सुरू झाल्यानंतर शेतीच्या कामांची लगबग सुरू होते. त्यामुळे पावसाळयात मजुरांकडून रोहयो कामांसाठी मागणीचे प्रमाण अत्यल्प असते; परंतु यंदाच्या पावसाळ्यात सद्य:स्थितीत जिल्ह्यातील कामांवरील मजूर उपस्थितीचे प्रमाण विचारात घेता, पावसाने दांडी मारल्याने पावसाळ्यातही रोहयो कामांसाठी मजुरांकडून मागणी वाढत असल्याचे चित्र आहे.
 
ग्रामपंचायतींची १८८६; यंत्रणांची १४८ कामे सुरू !
जिल्ह्यात रोहयोअंतर्गत २ हजार ३४ कामे सुरू असून, त्यामध्ये जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींची १ हजार ८८६ कामे आणि विविध यंत्रणांच्या १४८ कामांचा समावेश आहे.
 

Web Title: The support of Rohyo works in the hands of laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.