दराेड्याचा प्लान रचणाऱ्या तत्कालीन मॅनेजरला ठाेकल्या बेड्या

By आशीष गावंडे | Published: July 2, 2024 10:08 PM2024-07-02T22:08:47+5:302024-07-02T22:09:20+5:30

पाेलिसांनी सुरत,नाशिकमधून केली तीन आराेपींना अटक

The then manager who planned the robbery has arrested | दराेड्याचा प्लान रचणाऱ्या तत्कालीन मॅनेजरला ठाेकल्या बेड्या

दराेड्याचा प्लान रचणाऱ्या तत्कालीन मॅनेजरला ठाेकल्या बेड्या

अकाेला: न्यू आळशी प्लॉट येथील उद्योजक नवलकिशाेर केडिया यांच्या निवासस्थानी दराेडा घालणाऱ्या आराेपींच्या अवघ्या चार दिवसांत स्थानिक गुन्हे शाखा व खदान पाेलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. केडिया यांच्याकडे सन २०११ मध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या पुष्पराज शाहा रा.सुरत याच्यासह तीन आराेपींना बेड्या ठाेकल्याची माहिती मंगळवारी जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी आयाेजित पत्रकार परिषदेत दिली.

पुष्पराज शाहा (३६) रा.सुरत, पुष्पराजचा मामा सचिन शाहा, विनायक देवरे दाेन्ही राहणार नाशिक अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. तीन आराेपी अद्याप फरार असून त्यांचाशाेध घेतला जात आहे. खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या न्यू आळशी प्लॉटमध्ये उद्योजक नवलकिशाेर केडिया यांच्या निवासस्थानी २७ जून राेजी रात्री १० ते १०:३० वाजण्याच्या सुमारास चार ते पाच अज्ञात इसमांनी एका मुलीचा शाेध घेत असल्याचे सांगत घरात प्रवेश केला हाेता.

केडिया यांच्या गळ्याला चाकू लावत ‘तुमच्या मुलाला मुंबइत मारुन टाकू,त्याठिकाणी आमची माणसे उभी आहेत’, अशी धमकी देत लुटमार केली हाेती. याप्रकरणी खदान पाेलिसांत भादंवि कलम ३९२, ३९७, ४५२,३४ अन्वये गुन्हा दाखल असून त्यामध्ये कट रचने व दराेडा घालणे या कलमान्वये १२० ब, ३९५ कलमची वाढ करण्यात आल्याची माहिती जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली. पत्रकार परिषदेला शहर पाेलिस उपअधीक्षक सतीष कुलकर्णी, ‘एलसीबी’प्रमुख शंकर शेळके, खदानचे ठाणेदार गजानन धंदर उपस्थित हाेते. 
..........................................
१२ वर्षांपूर्वी ८० लाखांचा घाेळ
दराेड्याचा मुख्य सुत्रधार पुष्पराज शाहा असून ताे २०११ च्या सुमारास फिर्यादी केडिया यांच्याकडे मॅनेजर म्हणून काम करीत हाेता. त्यावेळी सहा हजार रुपये प्रति महिना मानधन असेल्या पुष्पराजने २०१२ मध्ये केडिया यांना ८० लाख रुपयांचा चूना लावला हाेता. त्यावरुन केडिया यांनी पुष्पराजला कामावरुन कमी केल्याची माहिती जिल्हा पाेलिस अधीक्षकांनी दिली. 
...........................................
...म्हणून आराेपींचा डाव फसला
केडिया यांच्या घराची व कुटुंबातील प्रत्येक सदस्याची दराेड्याचा सुत्रधार पुष्पराज याला इत्थंभूत माहिती हाेती. घरातील कपाटात लाखाे रुपये व दागदागिने राहत असल्याचेही त्याला माहिती हाेते. केडिया यांच्या घरी हात साफ केल्यास किमान २० लाख रुपये मिळतीलच,असा आराेपीला विश्वास हाेता. परंतु या घटनेच्या तीन महिन्यांपूर्वीच केडिया यांनी घरातील सर्व राेख व दागिने बॅंकेतील लाॅकरमध्ये ठेवल्याने आराेपींचा डाव फसला. 
.......................................
...अन् हाती आले अवघे पंधराशे रुपये
आराेपींनी केडिया यांच्या घरातील कपाटाची झडती घेतली. त्यात त्यांना काहीही आढळून आले नाही. घरातील माेलकरणीच्या कानाचे हिसकावलेले दागिने नकली हाेते. तसेच केडिया यांच्या पाकीटात अवघे पंधराशे रुपये हाेते. हेच पैसे घेऊन आराेपींनी घाइघाइत पळ काढला. 
..........................................
‘राघवेंद्र’ला मारुन टाकू!
आराेपींनी नवल केडिया यांच्या गळ्याला चाकू लावत ‘आरडाओरड केल्यास तुमचा मुलगा ‘राघवेंद्र’ला मारुन टाकू’ असा शब्दप्रयाेग केला आणि हाच धागा पकडून पाेलिस आराेपींपर्यंत पाेहाेचले. फिर्यादीचा मुलगा राघवेंद्र याला पाेलिसांनी विचारणा केली असता, मला या नावाने मुख्य आराेपी पुष्पराज हा हाक मारायचा,असे सांगितले. यावरुन पाेलिसांनी पुष्पराजचे लाेकेशन शाेधून त्याला बेड्या ठाेकल्या.

Web Title: The then manager who planned the robbery has arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.