पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने दिली धडक; कावड वाहणाऱ्या शिवभक्ताचा मृत्यू
By नितिन गव्हाळे | Published: September 11, 2023 05:18 PM2023-09-11T17:18:05+5:302023-09-11T17:18:13+5:30
पळसोद फाट्याजवळ घडली दुर्दैवी घटना
नितीन गव्हाळे, अकोला : कावड वाहून नेणाऱ्या अकोल्यातील शिवभक्तांवर काळाने घाला घातला आहे. अकोटच्या एका मंडळातील शिवभक्तांना भरधाव वाहनाने उडवले. या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना रविवारी मध्यरात्रीदरम्यान पळसोद फाट्याजवळ घडली.
अकोलेकरांचा लोकोत्सव असलेला कावड यात्रा महोत्सवादरम्यान पालखी कावडधारी काही शिवभक्त गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे पवित्र जल घेऊन रविवारी मध्यरात्री अकोला तर काही अकोटकडे मार्गस्थ झाले. अकोट येथील सिंधी कॉलनीतील सिंध नवयुवक मंडळ हे रविवारी दुपारी अकोट येथून गांधीग्राम इथे पूर्णा नदी पात्रात पवित्र जल आणण्यासाठी निघाले होते. मध्यरात्री जल घेऊन परतीच्या मार्गावर असताना अकोट-गांधीग्राम मार्गावरील पळसोद फाट्याजवळ पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने या मंडळातील शिवभक्तांना उडवले.
या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले. यापैकी एकाच्या डोक्यावर गंभीर मार लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. आकाश मनोहरलाल मोटवानी असं मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. तर सुरज बंगेशवर विरवानी हा जखमी झाला आहे. दरम्यान अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला होता, मात्र काही दूर अंतरावर पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे शिवभक्ताला आपला जीव गमावावा लागल्याचा आरोप केला जात आहे. या अपघातामुळे मोटवानी कुटुंबीयांसह अकोट तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.