पृथ्वीच्या जवळ ‘त्सूचिन्शान ॲटलास’ येतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 11:32 AM2024-09-24T11:32:33+5:302024-09-24T11:32:40+5:30

२७ सप्टेंबरपासून होणार दर्शन

The Tsuchinshan Atlas is coming closer to Earth | पृथ्वीच्या जवळ ‘त्सूचिन्शान ॲटलास’ येतोय

पृथ्वीच्या जवळ ‘त्सूचिन्शान ॲटलास’ येतोय

अकोला  : आपल्या सूर्यकुलाचे घटक असलेले धूमकेतू अति लंबवर्तुळाकार भ्रमण कक्षेत जेव्हा पृथ्वी व सूर्याजवळ येतात तेव्हा त्यांचे विलोभनीय दर्शन घडते. सद्य:स्थितीत असाच एक नवा धूमकेतू ‘त्सूचिन्शान ॲटलास’ २७ सप्टेंबरपासून पृथ्वीच्या जवळ येत आहे. आकाशात दिसणारा हा धूमकेतू त्सूचिन्शान ॲटलास किंवा C2023 A3 या नावाचा असून, त्याचा शोध  पर्पल माउंटन वेधशाळेने ९ जानेवारी २०२३ रोजी लावला.  

निरिक्षणासाठी योग्य कालावधी

२७ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान हा पाहुणा सूर्य आणि पृथ्वी जवळ येत असल्याने त्याचे तेज वाढणार आहे. हा अनोखा नजारा सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यात सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावर सिंह राशीजवळ आणि ऑक्टोबरच्या मध्यात सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात शुक्र ग्रहाजवळ बघता येईल.

लांबलचक शेपटीच्या आकारात दर्शन

१९८६ मध्ये आलेला हॅलेचा धूमकेतू अनेकांच्या स्मरणात असेल. हाच जेव्हा १९१० साली आला तेव्हा दिवसासुद्धा दिसायचा. सूर्यमालेच्या बाहेर ऊर्ट क्लाऊडच्या पट्ट्यातून सूर्याभोवती फिरणारे हे धूमकेतू जेव्हा पृथ्वी आणि सूर्याजवळ येतात तेव्हा त्यांच्यात असलेल्या खडक, धूळ, बर्फ व वायूंच्या मिश्रणाच्या अनियमित गोळ्यातील घटकांचे रूपांतर सूर्यप्रकाश व उष्णतेने लांबलचक शेपटीत होते. यालाच काही लोक ‘शेंडे नक्षत्र’ म्हणून ओळखतात. 

 लक्षावधी किलोमीटर दूर असलेल्या या नव्या पाहुण्याच्या दर्शनाचा दुर्लभ योग हजारो वर्षांनंतर जुळून येत आहे.याचा आनंद अवश्य घ्यायलाच हवा. 
- प्रभाकर दोड, ज्येष्ठ खगोल अभ्यासक, अकोला

Web Title: The Tsuchinshan Atlas is coming closer to Earth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.