आकाशात सलग चार दिवस पाहता येणार स्पेस स्टेशनचा नजारा
By Atul.jaiswal | Published: December 4, 2023 02:14 PM2023-12-04T14:14:34+5:302023-12-04T14:15:10+5:30
विशेष म्हणजे हा नजारा अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातून दिसणार आहे.
अकोला : पावसानंतर आकाशातील धुलीकणांचे प्रमाण कमी झाल्याने आकाश निरीक्षण अधिक स्पष्ट होत असते. ग्रह-ताऱ्यांसोबतच
आकाशात विविध घडामोडी अधुनमधून अनुभवता येतात.अशातच या महिन्यात मिथुन राशीतून होणारा उल्का वर्षाव व ६ ते ९ डिसेंबर या सलग चार दिवसांत संध्याकाळच्या सुमारास निरभ्र आकाशात फिरती चांदणी अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा अनोखा नजारा नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. विशेष म्हणजे हा नजारा अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातून दिसणार आहे.
अमेरिका, रशिया सह पंधरा देशांच्या संयुक्त प्रयत्नातून साकारलेल्या या प्रकल्पात अत्याधुनिक अंतराळ संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले असून, त्याव्दारे विविध देशांतील वैज्ञानिक अभ्यास व संशोधन कार्य करीत आहेत. फुटबॉलच्या मैदानापेक्षा दीडपट आकाराचे हे स्पेस स्टेशन पृथ्वीपासून साधारण चारशे किलोमीटर अंतरावरून सूमारे दीड तासात दरताशी २७,५०० कि.मी.या वेगाने फिरत असते. पृथ्वीवरुन ज्या भागावरुन याचा प्रवास होतो तेव्हा त्या भागातील लोकांना या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा फिरत्या चांदणीच्या स्वरुपात दर्शनाचा लाभ घेता येतो. स्थान परत्वे वेळ, दिशा व तेजस्वीतेत काही बदल संभवतात. असा हा अनोखा आकाश नजारा प्रत्येक आकाश प्रेमींनी आपआपल्या भागातून अवश्य अनुभवावा, असे आवाहन ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी केले आहे.
असे होईल दर्शन
बुधवार, ६ डिसेंबरला रात्रीच्या प्रारंभी ७ वाजता तीन मिनिटे फिरत्या तेजस्वी चांदणीचा प्रवास वायव्य ते पूर्वेकडे गुरु ग्रहाचे जरा अलिकडे होईल.
गुरुवार, ७ डिसेंबरला संध्याकाळी ६:१२ ते ६: १८ या वेळी स्पेस स्टेशन उत्तरेकडून पूर्वेकडे जाताना दिसेल.
शुक्रवार, ८ डिसेंबरला शूक्रवारी पुन्हा ७ वाजता फिरती चांदणी पश्चिम आकाशात दक्षिण दिशेला सरकताना पाहता येईल.
शनिवार, ९ डिसेंबरला संध्याकाळी ६-११वा.वायव्येकडून आग्नेय दिशेला सुमारे सहा मिनिटे बघता येईल.