मुलींच्या वसतिगृहात वेशांतर करून युवक शिरला! थेट मुलींच्या रुममध्ये गेला, कृषी विद्यापीठातील वसतिगृहातील सुरक्षा चव्हाट्यावर
By नितिन गव्हाळे | Updated: August 23, 2022 15:10 IST2022-08-23T15:09:23+5:302022-08-23T15:10:18+5:30
Akola News: डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात सध्या अनागोंदी कारभार सुरू असून विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात एक युवक वेशांतर करून शिरल्याचा व्हिडिओ मंगळवारी सकाळी व्हायरल झाला. हा प्रकार आठ दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुलींच्या वसतिगृहात वेशांतर करून युवक शिरला! थेट मुलींच्या रुममध्ये गेला, कृषी विद्यापीठातील वसतिगृहातील सुरक्षा चव्हाट्यावर
- नितीन गव्हाळे
अकोला- डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात सध्या अनागोंदी कारभार सुरू असून विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात एक युवक वेशांतर करून शिरल्याचा व्हिडिओ मंगळवारी सकाळी व्हायरल झाला. हा प्रकार आठ दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाहीतर हा युवक मुलींच्या रूममध्येसुद्धा गेला. या घटनेमुळे कृषि विद्यापीठातील वसतिगृहातील सुरक्षा चव्हाट्यावर आली आहे. विशेष म्हणजे, या युवकाला मुलींना वसतिगृहात शिरण्यासाठी मदत केल्याचे दिसून येत आहे.
कृषि विद्यापीठ परिसरातील उजव्या बाजुला सावित्री वसतिगृह आहे. याठिकाणी सुरक्षा रक्षकासोबतच, वसतिगृह अधीक्षिकासुद्धा आहे. मुलींच्या वसतिगृहामध्ये बाहेरील व्यक्तींसह अनोळखी युवकांना प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही हा युवक मुलीसारखे तोंडाला स्कार्प बांधून, दोन युवतींसोबत वसतिगृहात शिरत असल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा युवक व दोन युवती एकमेकांना ओळखत असून, ते बीएससी ॲग्रीकल्चरचे विद्यार्थी दिसत असून, या युवकाला वसतिगृहात चोरून येण्यासाठी वसतिगृहातील दोन युवतींनी त्याला मदत केल्याचे दिसून आले. वसतिगृहात यशस्वीरित्या शिरल्यानंतर या दोन्ही युवती त्याला त्यांच्या रूममध्ये घेऊन जातात. याठिकाणी बेडवर बसून गप्पा करण्यासाठी सेल्फीसुद्धा काढत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. मंगळवारी सकाळी उघडकीस आलेल्या प्रकारामुळे कृषि विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वसतिगृह अधीक्षिका काय करत होत्या?
मुलींच्या वसतिगृहामध्ये पुरूष, युवकांना जाण्यास मनाई आहे. असे असतानाही दोन युवती, युवकाला वेशांतर करून वसतिगृहातच नव्हेतर रूममध्ये घेऊन गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. असा प्रकार घडणे हे गंभीर असून, यावेळी वसतिगृहाच्या अधीक्षिका काय करत होत्या. त्यांचे वसतिगृहावर नियंत्रण नाही काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. पालक मोठ्या आशेने मुलींना शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवितात. वसतिगृहातील वातावरण सुरक्षित असेल म्हणून वसतिगृहाच्या अधीक्षिका, सुरक्षारक्षकांवर ते विश्वास टाकतात. परंतु येथे तर सर्वकाही आलबेल आहे. बाहेरील युवक मुलींच्या वसतिगृहात शिरल्यामुळे येथील इतर मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे.
कारवाईची गरज
मुलींच्या वसतिगृहात युवक शिरल्यामुळे येथील मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे. उद्या कोणीही वसतिगृहात शिरून मुलींची छेडखानी करेल. भविष्यात असा प्रकार होऊ नये. या दृष्टीकोनातून कुलगुरूंनी वसतिगृहाच्या अधीक्षिका आणि सुरक्षारक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.