पुराच्या पाण्यात युवक दुचाकीसह वाहून गेला, सुदैवाने बचावला
By Atul.jaiswal | Published: September 14, 2022 01:19 PM2022-09-14T13:19:43+5:302022-09-14T13:20:04+5:30
पोहता येत असल्यामुळे युवक सुदैवाने बचावल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.
अकोला : जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून, नदी-नाल्या पुराने ओसंडून वाहत आहेत. मुर्तीजापूर तालुक्यातील कमळगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी पुलावरून वाहत असताना दुचाकी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पडले. पुराच्या लोंढ्यात दुचाकीस्वार युवक वाहून गेला. पोहता येत असल्यामुळे युवक सुदैवाने बचावल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.
मुर्तीजापुर तालुक्यातील ब्रम्ही गावाजवळील कमळगंगा नदीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना गुंजवाडा येथील एक तरुणाने दुचाकीवरुन पाण्यातुन जायचे धाडस केले. तेथे उपस्थित असलेल्यांनी त्याला पुराच्या पाण्याची कल्पना दिली. परंतु, कुणालाही न जुमानता दुचाकीस्वार पुलावरील पाण्यातून दुचाकी काढत पुढे गेला. पुलाच्या मध्यभागी आला असता पाण्याच्या प्रवाहापुढे त्याचा टीकाव लागला नाही. त्यामुळे तो युवक दुचाकीसह पुलावरून नदीपात्रात कोसळला व वाहत गेला.
सुदैवान त्या युवकाला पोहणे येत असल्यामुळे पुराच्या पाण्यात पोहत तो सुखरुपपणे काठावर आला. परंतु त्याची दुचाकी पुरात वाहुन गेली. या घटनेची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली. पथक निघण्याच्या तयारीत असतानाचा मुर्तीजापूरचे तहसिलदार पवार यांनी तो युवक सुखरुपपणे पोहत बाहेर आल्याचे दुरध्वनीवरून कळविले. त्यामुळे रेस्क्यु ऑपरेशनला जाण्याची गरज पडली नाही, असे पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी सांगितले.
अकोला : पुराच्या पाण्यात युवक दुचाकीसह वाहून गेला, सुदैवाने बचावलाhttps://t.co/CbvSFUBywhpic.twitter.com/n8VYloFxCB
— Lokmat (@lokmat) September 14, 2022