पोलिसाच्याच घरात चोरी; पिस्तूलसह दागीने व रोख पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 01:37 PM2019-07-21T13:37:32+5:302019-07-21T13:37:38+5:30
अज्ञात चोरटयांनी हैदोस घालत जोशी यांची सरकारी पिस्तूल पळविल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी उघडकीस आली.
अकोला: मुर्तीजापूर पोलिस ठाण्यातुन बदली झालेले तसेच अकोल्यात रुजु झालेले पोलीस उपनिरीक्षक राजेश जोशी यांच्या गीता नगर येथील निवासस्थानी अज्ञात चोरटयांनी हैदोस घालत जोशी यांची सरकारी पिस्तूल पळविल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. पिस्तूलसोबतच सोन्याचे दागीने व रोखही चोरटयांनी लंपास केली असून चक्क पोलिस अधिकाऱ्याच्या घरी चोरी झाल्याने चोरटे आता पोलिसांवरही भारी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
अकोल्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणूण रुजु झालेले राजेश जोशी हे कुटुंबीयासह बाहेर असतांना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी त्यांच्या गीता नगर येथील आशिर्वाद अपार्टमेंटमधील घरात प्रवेश केला. त्यानंतर जोशी यांच्या घरातील त्यांची शासकीय पिस्तूल, सोन्याचे दागीने व रोखरक्कम लंपास केली. या घटनेची माहिती जुने शहर पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर चोरटयांचा शोध सुरु केला. चक्क पोलिस अधिकाºयाच्या घरीच चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख शैलेष सपकाळ, जुने शहरचे ठाणेदार प्रकाश पवार यांनी पोलिस ताफ्यासह धाव घेतली. या प्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.