पातुरात चोरी; सात लाख रुपयांचा ऐवज लंपास
By admin | Published: March 24, 2017 02:18 AM2017-03-24T02:18:26+5:302017-03-24T02:18:26+5:30
पातूर शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.
पातूर (अकोला), दि. २३- पातूर शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. येथील बालाजी वेटाळातील रहिवासी शिक्षकाच्या बंद घरात १७ ते २२ मार्चदरम्यान घरावरील टिनपत्रा कापून सोने-चांदी व रोख रक्कम अशी सात लाख रुपये किमतीच्या मालाची चोरी करण्यात आली. ही बाब २२ मार्चच्या रात्री उघडकीस आली. मागील दोन महिन्यांत शहरात चोरीच्या ८ ते १0 घटना घरे किंवा दुकानांची टिनपत्रे कापूनच घडल्या आहेत. त्यामुळे पातुरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
पातुरातील अगदी मध्यवर्ती भागातील कालिकामाता मंदिराजवळील बालाजी वेटाळात राहणारे फिर्यादी विनायक सखाराम मुळे हे सेवानवृत्त शिक्षक १७ मार्च रोजी संपूर्ण कुटुंबासह कामानिमित्त नाशिकला गेले होते. ते २२ मार्चच्या रात्री १0 वाजता घरी आले असता, त्यांना दाराचे कुलूप तोडल्याचे व घरावरील टिन अज्ञात चोरट्यांनी कापले असल्याचे आढळले. यानंतर त्यांनी घरातील सामानाची तपासणी केली असता, घरातील २३0 ग्रॅम सोने, ३८0 ग्रॅम चांदीची भांडी व रोख ९५ हजार रुपये असा एकूण सात लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची बाब लक्षात आली. या चोरीमध्ये ५0 ग्रॅमची सोन्याची पूजेची महालक्ष्मीची मूर्ती, ७0 ग्रॅमचे सोन्याचे कानातील दोन टाप्स, सात ग्रॅमचे सोन्याचे महालक्ष्मीचे दोन नग, गळ्यातील मंगळसूत्र असा २३0 ग्रॅम सोन्याचा ऐवज, १0 ग्रॅमचे चांदीचे २६ नाणे, २0 ग्रॅमची चांदीची एक नग कुचरी, प्रत्येकी ५0 ग्रॅम वजनाचे चांदीचे महालक्ष्मीसमोरील दोन नग प्याले अशी ३८0 ग्रॅम चांदीची भांडी तसेच रोख ९५ हजार रुपये असा एकूण सात लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. त्यामुळे पोलिसांच्या गस्ती पथकाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.