‘कोरोना’च्या सावटाखालीही त्यांची सेवा सुरूच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 03:42 PM2020-03-27T15:42:46+5:302020-03-27T15:43:03+5:30
या तुंबलेल्या नाल्या कोरोनाच्या जीवघेण्या वातावरणातही ते साफ करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कुणीही बाहेर निघू नका, घरीच थांबा, हा सरकारने आदेश दिला आहे. त्यासाठी राज्यात संचारबंदीही लागू केली आहे; मात्र काही सेवा अशा आहेत की त्या कधीच थांबत नाहीत. एरव्ही कायदा व सुव्यवस्थेसाठी लावल्या जाणाऱ्या संचारबंदीत काम करताना या सेवा क्षेत्रातील लोकांना जगण्याची धास्ती नसते; मात्र आता थेट जीवाशीच खेळ असलेल्या कोरोनाशी लढाई आहे; मात्र अशा लढाईतही जीवावर उदार होऊन एक घटक राबतो आहे, रस्त्यावरच्या घाणीत.., कचºयात.., गल्लीबोळात! होय, तोच तो ‘सफाई कामगार’!
घरात बसून स्वच्छतेची काळजी करणाऱ्यांजवळ सॅनिटायझर आहे. मास्क आहेत. दिवसातून पंधरा वेळा हात धुण्यासाठी नळ आहेत; मात्र लोकांच्या स्वच्छतेची काळजी वाहणारे सफाई कामगार तोंडावर मास्क चढवून आणि हातात ग्लोव्हज घालून गल्लीबोळातील कचरा स्वच्छ करीत आहेत.
रस्त्यावर फेकलेले मास्क, पाऊच, पालापाचोळा आणि रस्त्यावरून धावणाºया अगणित माणसांच्या पायाला चिकटलेले कचºयातील जीवजंतूही ते उचलत आहेत. आम्ही घरात बसून चकचकीत आंघोळ करतो, साबण वापरून भांडी घासतो.
घरातील वापराचे पाणी पाइपमधून नालीत सोडतो. या तुंबलेल्या नाल्या कोरोनाच्या जीवघेण्या वातावरणातही ते साफ करीत आहेत.
यांचा प्राधान्याने विचार करा...
स्वत:चा जीव धोक्यात घालून समाजाचे रक्षण करणाºया या सफाई कामगारांना आम्ही काय देतो, कधी बोलतो आपण मोकळेपणे त्यांच्याशी, उच्चभ्रूपणाची झूल पांघरणारे आम्ही त्यांचा कधी विचारही करीत नाही. त्यांच्याशी आम्ही कधी प्रेमाने बोलत नाही. घरासमोरची नाली साफ करणाºयांना कधी चहासाठीही विचारत नाही, प्रकृतीची चौकशी करणे तर दूरच राहिले! यांच्याशी समाज तुसडेपणाने वागूनही ते मात्र निष्ठेने सेवा करतात. कोरोनाच्या निमित्ताने सारे जग घरात बंदिस्त झाले असताना त्यांच्या सुरू असलेल्या सेवेचे मोल कसे करणार, किमान त्यांच्याशी आदरपूर्वक वागले तरी खूप आहे, तेवढे तरी कराल ना?