मनपाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता मनोहर बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 04:01 PM2018-07-07T16:01:15+5:302018-07-07T16:03:44+5:30
मनपाच्या बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता जयप्रकाश मनोहर यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी घेतला आहे.
- आशिष गावंडे
अकोला : बांधकामाचा कालावधी उलटून गेल्यावर केवळ कागदोपत्री आवारभिंत उभारून शासनाच्या ४ लाख ६९ हजार रुपयांवर ताव मारणाऱ्या मनपाच्या बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता जयप्रकाश मनोहर यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी घेतला आहे. मनपात आस्थापनेवर उपअभियंता म्हणून सेवारत असणाºया जयप्रकाश मनोहर यांचा बडतर्फीचा प्रस्ताव सभागृहाकडे सादर करण्यात आला आहे. प्रशासनाने मानसेवी उपअभियंता राजेश श्रीवास्तव यांची सेवा यापूर्वीच समाप्त केली आहे.
कौलखेड परिसरात मनपाच्या मालकीच्या असलेल्या शिव उद्यानच्या जागेवर वृक्षारोपण करण्यासाठी उद्यानला आवारभिंत उभारण्याचे काम २०१२ मध्ये प्रस्तावित करण्यात आले होते. त्यासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थानमधून ४ लाख ८७ हजार रुपये निधी मंजूर झाला होता. आवारभिंत बांधण्याचा कंत्राट मनपातील कंत्राटदार शोएब सोरटिया यांना दिला होता. या कामाचे अंदाजपत्रक जयप्रकाश मनोहर यांनी तयार केले होते. त्यावर तत्कालीन उपअभियंता व कार्यकारी अभियंता म्हणून राजेश श्रीवास्तव यांची स्वाक्षरी होती. १५ डिसेंबर २०१२ रोजी आवारभिंत बांधण्याचे कार्यादेश मिळाल्यानंतर कंत्राटदाराला १४ फेब्रुवारी २०१३ पर्यंत बांधकाम करण्याची अट नमूद होती. फेब्रुवारी २०१३ पर्यंत कागदोपत्री बांधकाम केल्यानंतर तत्कालीन कार्यकारी अभियंता राजेश श्रीवास्तव, उपअभियंता जयप्रकाश मनोहर, कनिष्ठ अभियंता घनश्याम उघडे व कंत्राटदार शोएब सोरटिया यांनी शासन निधीचा अपहार केल्याचे समोर आले. याप्रकरणी माजी उपमहापौर विनोद मापारी यांनी मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर अजय लहाने यांनी आवारभिंतीच्या कामाची चौकशी सुरू केली. प्रशासनाने चौकशी केल्यास सर्व जण अडकणार या भीतीपोटी संबंधित कंत्राटदार व मनपा कर्मचाºयांनी २३ मे २०१५ रोजी आवारभिंतीच्या बांधकामाला सुरुवात केली. सदरचे काम ५ डिसेंबर २०१५ रोजी पूर्ण करण्यात आले. तोपर्यंत फार उशीर झाला होता. तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी तडकाफडकी मानसेवी उपअभियंता राजेश श्रीवास्तव, कनिष्ठ अभियंता घनशाम उघडे यांची सेवा समाप्त केली. तसेच आस्थापनेवरील उपअभियंता तथा कार्यकारी अभियंता जयप्रकाश मनोहर यांच्या विभागीय चौकशीचा आदेश जारी केला.