...तर मनोज जरांगे हे शरद पवारांचा माणूस असल्याचं सिद्ध होईल; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 05:58 PM2024-08-05T17:58:29+5:302024-08-05T18:00:00+5:30
प्रकाश आंबेडकर हे गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधत आहेत.
Prakash Ambedkar ( Marathi News ) : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात सध्या आरक्षण बचाव यात्रा काढली आहे. या यात्रेच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर हे गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधत आहेत. अशातच आंबेडकर यांनी अकोला इथं बोलत असताना जरांगे पाटलांवर निशाणा साधत जरांगे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच उभं केलं असल्याचा घणाघाती आरोप केला आहे.
आरक्षण बचाव यात्रेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "मनोज जरांगे पाटील हा शरद पवार यांनीच उभा केलेला माणूस आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी २८८ मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय घेतला नाही तर त्यांच्यामागे पवारांचाच हात असल्याचं सिद्ध होईल," असा दावा आंबेडकर यांनी केला आहे.
"राज्यात १०० ओबीसी आमदार निवडून आणू"
आरक्षणावरून सुरू असलेल्या वादावर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी आम्ही आगामी निवडणुकीत राज्यात १०० ओबीसी आमदार निवडून आणू, अशी घोषणा केली आहे. "मनोज जरांगेंची जी ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी आहे, त्यामुळे राज्यात दोन तट पडले आहेत. राजकीय भांडणाचे सामाजिक भांडणात रुपांतर करण्याचे अनेकांचे मनसुबे ओबीसी आरक्षणाच्या यात्रेतून उध्वस्त झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या नंतर सरकार ओबीसींची जातनिहाय जनगणना मान्य करून घेईल. तसेच जात जनगणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही तो पर्यंत ओबीसी आरक्षणावर स्थगिती दिली जाईल. असा निर्णय घेतला जाईल, असे अनेक जण सांगत आहेत. त्यामुळे आम्ही किमान १०० ओबीसी आमदार निवडून आणू ," असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.