पांढुर्ण्यासह परिसरात सोयाबीनला शेंगाच नाहीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:24 AM2021-09-15T04:24:10+5:302021-09-15T04:24:10+5:30
पांढुर्णा: यंदा परिसरात अति पाऊस झाल्याने, हजारो हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. असे असताना सद्यस्थितीत सोयाबीनच्या पिकाला शेंगाच ...
पांढुर्णा: यंदा परिसरात अति पाऊस झाल्याने, हजारो हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. असे असताना सद्यस्थितीत सोयाबीनच्या पिकाला शेंगाच नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. काही शेतात शेंगांचे प्रमाण कमी दिसून येत आहेत. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याचे चित्र असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
पातूर तालुक्यातील पांढुर्णा शिवारात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला पसंती दिल्याने मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली आहे. परिसरातील अनेक शेतांत सोयाबीनला शेंगा न लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टी व अति पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या मूग, उडीद पिकाचे नुकसान झाले आहे. परिसरात संबंधित विभागाकडून पंचनामे झाले. मात्र, अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही. सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत असताना, अतिवृष्टी झाल्याने फुलगळ झाली आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाला शेंगा लागल्या नसल्याचा तर्क काढण्यात येत आहे. काही शेतात शेंगांची संख्या कमी असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
------------------------------
अतिवृष्टीमुळे नुकसान, मदत मिळाली नाही
जुलै महिन्यात तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने, खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. परिसरात पंचनामे झाले. मात्र, अद्यापही आर्थिक मदत मिळाली नाही. शेतकरी संकटात असल्याने त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
-------------------------------
पीकविम्याचा लाभ देण्याची मागणी
परिसरात खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच सोयाबीनला शेंगा लागल्याच नसल्याने उत्पादन घटणार आहे. त्यामुळे या भागात संबंधित विभागाने सर्व्हे करून पीकविम्याचा लाभ देण्याची मागणी होत आहे.