वऱ्हाडातील बुद्धिबळपटूंमध्ये नावीन्यता आहे; गरज आहे संयमाची - ग्रँड मास्टर ठिपसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 01:03 PM2019-02-25T13:03:42+5:302019-02-25T13:03:50+5:30
अकोला: वऱ्हाडात विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळ या खेळाविषयी प्रेम पाहून आनंद झाला. येथील बुद्धिबळपटूंमध्ये नावीन्यता आहे; पण त्याला जोड हवी ती संयमाची, असे मत मुंबई येथील ग्रँड मास्टर प्रवीण ठिपसे यांनी व्यक्त केले.
अकोला: वऱ्हाडात विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळ या खेळाविषयी प्रेम पाहून आनंद झाला. येथील बुद्धिबळपटूंमध्ये नावीन्यता आहे; पण त्याला जोड हवी ती संयमाची, असे मत मुंबई येथील ग्रँड मास्टर प्रवीण ठिपसे यांनी व्यक्त केले.
शासकीय विश्रामगृह येथे रविवार २४ फेब्रुवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अकोला बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित दोन दिवसीय शिबिराच्या निमित्ताने ते अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी येथील बुद्धिबळपटूंना मार्गदर्शन करताना आलेले अनुभव सांगितले. येथील बुद्धिबळ पटूंची कल्पनाशक्ती चांगली असून, लक्षभेदी खेळण्यातही महारथ असल्याचे त्यांनी सांगितले; परंतु यासोबतच या खेळाडूंना संयमाची गरज असून, विपरीत परिस्थितीत काय करायचे हे देखील शिकण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच खेळाडूंना त्यांच्या जवळ असलेल्या माहितीला ज्ञानामध्ये परिवर्तित करता येणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. केवळ दोन वा तीन दिवसांच्या शिबिरातून हा बदल होणार नाही; पण त्याची सुरुवात मात्र नक्कीच झाल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला डॉ. भारती राठी, प्रवीण हेंड, राहुल भारसाकळे, विजय फिरके यांची उपस्थिती होती.
ग्रँड मास्टर ठिपसे यांना मिळालेले पुरस्कार
ग्रँड मास्टर ठिपसे यांनी सात वेळा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले असून, त्यांनी आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. या शिवाय यांनी अर्जुन पुरस्कार, दादोजी कोंडदेव पुरस्कार, कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप, बेस्ट स्पोर्ट्समन, महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे.