राज्यातील १ कोटी ८७ लाख विद्यार्थ्यांचे आधार लिंकिंगच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 01:28 PM2018-08-18T13:28:22+5:302018-08-18T13:30:11+5:30
राज्यातील २ कोटी २६ लाख २0 हजार २३२ विद्यार्थ्यांपैकी १ कोटी ८७ लाख ३ हजार १८६ विद्यार्थ्यांचे अद्यापही आधार कार्ड लिंकिंग करण्यात आले नाही.
- नितीन गव्हाळे
अकोला: २0१८ व १९ या वर्षाच्या संचमान्यतेमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश करण्यासाठी त्यांचे आधार क्रमांक अपलोड करावे लागत आहे. आधार क्रमांक अपलोड करण्यासाठी मुदत देण्यात आली असल्यामुळे सध्या शिक्षकांची विद्यार्थ्यांची माहिती, आधार क्रमांक भरण्याची लगबग सुरू आहे; परंतु राज्यातील २ कोटी २६ लाख २0 हजार २३२ विद्यार्थ्यांपैकी १ कोटी ८७ लाख ३ हजार १८६ विद्यार्थ्यांचे अद्यापही आधार कार्ड लिंकिंग करण्यात आले नाही. आधार कार्ड नसल्यामुळे त्यांची माहिती संचमान्यतेमध्ये कशी भरावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संचमान्यतेमध्ये हजारो विद्यार्थ्यांचे आधार लिंकिंग होत नसल्याने दरवर्षी अनेक शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ येते.
जिल्हा परिषद, मनपा, न.प.सह खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी संख्या घटत असल्याने शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. त्यातही शासनाने यातील गैरप्रकार रोखण्यासाठी संचमान्यतेमध्ये प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या माहितीसह त्यांचा आधार क्रमांक देणे अनिवार्य केले आहे; परंतु संचमान्यतेमध्ये विद्यार्थ्यांचा, वर्गाचा समावेश करताना शिक्षकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अतिरिक्त ठरण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, या दृष्टिकोनातून शिक्षक धावपळ करून, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड मिळवून त्यांचे क्रमांक संचमान्यतेमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातही वर्गांमधील अर्ध्याधिक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नसल्याने संचमान्यतेमध्ये त्यांचा समावेश करावा तरी कसा, असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे. एका वर्गातील अर्ध्याधिक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, त्याचा क्रमांक संचमान्यतेमध्ये समाविष्ट केला नाही, तर शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ येत आहे. यावर्षीसुद्धा अनेक शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या संख्येअभावी अतिरिक्त ठरावे लागले. २0१८ व १९ च्या संचमान्यतेमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश करण्यासाठी शिक्षण विभागाने मुदत दिली आहे. त्यासाठी शिक्षक धावपळ करीत आहेत; परंतु हजारो विद्यार्थ्यांकडे अद्यापही आधार कार्ड नसल्यामुळे त्यांची संख्या संचमान्यतेमध्ये कशी समाविष्ट करावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यार्थी व पालकांना वारंवार सूचना देऊनही आधार कार्ड मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे लिंकिंग करण्यात अडचणी येत आहेत.
संचमान्यतेमध्ये विद्यार्थ्यांची आधार लिंकिंग महत्त्वाचे आहे. शिक्षकांनी त्यांच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा स्टुडंट पोर्टलवर संचमान्यतेमध्ये समावेश करावा आणि पुढील वर्षी होणारी गैरसोय टाळावी.
- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी,
माध्यमिक जि.प. अकोला.