स्थायीच्या सभेत आदेश देऊनही शाखा अभियंत्यावर कारवाई नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 02:33 AM2018-02-19T02:33:47+5:302018-02-19T02:34:00+5:30
अकोला : बाळापूर पंचायत समितीचे शाखा अभियंता वामन राठोड यांच्या कार्यकाळात कामांमध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठला असून, तो प्रकार अनेक कामांतून पुढे आला. त्यासाठी दिलेल्या नोटिशीच्या स्पष्टीकरणानंतर प्रभार काढण्यासोबतच दोन वेतनवाढी रोखण्याच्या कारवाईचा आदेश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी स्थायी समितीच्या सभेत २0 सप्टेंबर रोजी दिला. अद्यापही ती कारवाई कागदावरच सुरू असल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बाळापूर पंचायत समितीचे शाखा अभियंता वामन राठोड यांच्या कार्यकाळात कामांमध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठला असून, तो प्रकार अनेक कामांतून पुढे आला. त्यासाठी दिलेल्या नोटिशीच्या स्पष्टीकरणानंतर प्रभार काढण्यासोबतच दोन वेतनवाढी रोखण्याच्या कारवाईचा आदेश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी स्थायी समितीच्या सभेत २0 सप्टेंबर रोजी दिला. अद्यापही ती कारवाई कागदावरच सुरू असल्याची माहिती आहे.
शाखा अभियंता वामन राठोड यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या कामांमध्ये मोठे घोळ केल्याचे प्रकार सातत्याने पुढे येत आहेत. त्यावर अनेक तक्रारीही झाल्या. स्थायी समिती, सर्वसाधारण सभेत सदस्यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. मात्र, सभा आटोपल्यानंतर अधिकारी त्या मागणी, ठरावाला केराची टोपली दाखवत असल्याचे अनेक प्रकारही घडत आहेत. शाखा अभियंता राठोड यांच्याबाबत २0 सप्टेंबर २0१७ रोजीच्या बैठकीत विविध तक्रारी करण्यात आल्या. त्यामध्ये वाडेगाव येथील दलित वस्ती काम मंजूर ठिकाणी न करता भलत्याच ठिकाणी केले. त्यासाठी शाखा अभियंता यांनी आधी दिलेले लेआउट ठिकाण वगळण्यात आले. विशेष म्हणजे, त्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केल्याचा फोटो लावण्यात आला. या प्रकाराने जिल्हा परिषद सदस्याचा अवमान झाल्याचा मुद्दा डॉ. हिंमत घाटोळ यांनी लावून धरला. शाखा अभियंता राठोड यांनी बाळापूर, पातूर तालुक्यात असे कामे करून हैदोस घातल्याचेही डॉ. घाटोळ यांनी सभागृहाला सांगितले होते. तसेच कारवाईची मागणी केली. त्यानंतर सस्ती येथील आरोग्य केंद्र बांधकाम निकृष्ट होत आहे. बाळापूर, पातूर तालुक्यातील इतरही कामांमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. शाखा अभियंता राठोड मनमानी करत आहेत. ठेकेदारांना हाताशी धरून कामे करत आहेत. त्यामुळे त्यांची बाळापूर पंचायत समितीतून बदली करावी, तसेच प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंत्यांनी ८ सप्टेंबर रोजीच बाळापूर गटविकास अधिकार्यांना चौकशी करण्याचे पत्र दिल्याचे सांगितले. संतप्त सदस्यांनी कारवाईची मागणी लावून धरल्याने, सभेला उपस्थित असलेले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवार यांनी शाखा अभियंता राठोड यांचा प्रभार काढून घ्यावा, तसेच दोन वेतनवाढी रोखण्यासाठी फाइल सादर करण्याचे निर्देश बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले. त्यानुसार पाच महिन्यांपासून अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे राठोड यांना पाठीशी घालण्याचा प्रकार सातत्याने सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे.