बालव्यंगत्वावर नियंत्रणासाठी ‘एमआर’ लसीकरणाला पर्याय नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 03:14 PM2018-12-02T15:14:49+5:302018-12-02T15:14:53+5:30
अकोला : जन्मत:च बाळाला व्यंगत्व किंवा माता मृत्यूचे प्रमाण राज्यात लक्षणीय आहे. अशा परिस्थितीत भविष्यात सशक्त पिढीसाठी आजच्या स्थितीला गोवर-रुबेला (एमआर) लसीकरणाशिवाय पर्याय नाही.
- प्रवीण खेते
अकोला : जन्मत:च बाळाला व्यंगत्व किंवा माता मृत्यूचे प्रमाण राज्यात लक्षणीय आहे. अशा परिस्थितीत भविष्यात सशक्त पिढीसाठी आजच्या स्थितीला गोवर-रुबेला (एमआर) लसीकरणाशिवाय पर्याय नाही. असे असले तरी मोहिमेवरील अफवांचे सावट आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान आहे.
पहिल्यांदाच गोवर, रुबेला असे दुहेरी लसीकरण एकाच इंजेक्शनच्या माध्यमातून देण्यात येत आहे. मोहीम सुरू होऊन पाच दिवस झालेत; परंतु त्यावरील अफवांचे सावट आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान ठरत आहे. गोवर आणि रुबेला हे दोन्ही संसर्गजन्य आजार असून, त्याचा सर्वाधिक धोका १५ वर्षांखालील बालकांना आहे. रुबेला हा आजार जितका नवजात बालकांसाठी घातक तितकाच गरोदर महिलांसाठीही जीवघेणा ठरू शकतो. गोवरदेखील १५ वर्षांखालील मुलांसाठी जीवघेणा ठरू शकतो. म्हणूनच कमी वेळेत दोन्ही लसी नऊ महिने पूर्ण केलेल्या तसेच १५ वर्षांखालील वयोगटातील बालकांना गोवर, रुबेला लसीकरण दिले जात आहे; परंतु पहिल्यांदाच या दुहेरी लसीकरणामुळे अफवाही वाऱ्यासारख्या पसरू लागल्या. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी लसीकरणाला विरोध होऊ लागला. त्यावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील ३ लाख १२ हजार ५१५ बालकांना लस दिली जाणार आहे. हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, शासकीय रुग्णालये, अंगणवाडी केंद्र व मदरसा आदी ठिकाणी राबविण्यात येत आहे.
रुबेला, गोवरमुळे या समस्या!
रुबेला हा आजार गर्भवतींमध्ये, तर गोवर नऊ महिन्यांपासून ते १५ वर्षांखालील बालकांसाठी जीवघेणा ठरू शकतो. या आजारामुळे काय समस्या उद््भवू शकतात, चला तर पाहू या...
रुबेला
मेंदू अविकसित
बहिरेपणा
मोतीबिंदू
गोवर
अंगावर पुरळ येणे
निमोनियाची शक्यता
रोगप्रतिकारक शक्ती कमी होते
नियंत्रित न झाल्यास बाळाचा मृत्यू
जिल्ह्यात गोवरची स्थिती
एप्रिल ते जून साथीचा कालावधी
वर्षभरात गोवरचे ३७ रुग्ण
मे महिन्यात ९, तर जूनमध्ये १० रुग्ण
लसीकरणाचे फायदे...
जन्माला येणाºया बालकाचे वजन वाढण्यास मदत
बौद्धिक क्षमता उत्तम
भविष्यातील पिढी सशक्त
जिल्ह्यात बालक व माता मृत्यूदर
अर्भक मृत्यूदर - २१.८ टक्के
बाल मृत्यूदर - ४.५ टक्के (५ ते १५ वर्षांआतील)
माता मृत्यू दर - ५६ टक्के (राज्यात ६१ टक्के)
थोडक्यात लसीकरण मोहीम
ध्येय - तीन लाख १२ हजार ५१५ बालक
साध्य - ८८,३३९ बालक (२८.२६ टक्के)
२८४ एएनएम कार्यरत
१३९७ शाळांमध्ये समुपदेशन
या समस्या सामान्य
चक्कर येणे
खाज सुटणे
मळमळ होणे
जागतिक आरोग्य संघटनेंतर्गत जगभरात ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे ही लस पूर्णत: सुरक्षित असून, त्यामुळे कुठल्याच प्रकारचा धोका नाही. रुबेला आणि गोवरपासून बचावासाठी या लसीकरणाला पर्याय नाही, त्यामुळे पालकांनी यासाठी पुढाकार घ्यावा.
- डॉ. एम. एम. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी.