सर्वसाधारण सभेत चर्चा नाहीच; महापौरांनी गुंडाळली सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:30 PM2019-06-22T12:30:06+5:302019-06-22T12:30:48+5:30
सविस्तर चर्चा करण्याची शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांची मागणी महापौर विजय अग्रवाल यांनी सभागृहात पुन्हा धुडकावून लावली.
अकोला: ‘अमृत’योजनेंतर्गत शहरात सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून, त्याला पायबंद घालण्यासाठी सविस्तर चर्चा करण्याची शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांची मागणी महापौर विजय अग्रवाल यांनी सभागृहात पुन्हा धुडकावून लावली. या मुद्यावरून शिवसेना व काँग्रेसच्या नगरसेवकांनी गदारोळ घातला. या धामधुमीत महापौर विजय अग्रवाल यांनी विषय सूचीवरील सर्व विषय मंजूर करत अर्ध्या तासात सर्वसाधारण सभा गुंडाळली. यामुळे संतप्त झालेल्या राजेश मिश्रा यांनी माईकची फेकफाक करून रोष व्यक्त केला.
चार महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर शुक्रवारी महापालिकेच्या मुख्य सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे या सभेत शहर विकासाच्या मुद्यांवर तसेच अकोलेकरांना भेडसावणाऱ्या समस्यांवर सविस्तर चर्चा होऊन त्यावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा होती. सभेला सुरुवात होताच शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी ‘अमृत’योजनेंतर्गत शहरातील जलवाहिनीच्या मुद्यावर चर्चा करण्याची विनंती महापौर विजय अग्रवाल यांच्याकडे केली. ही मागणी फेटाळून लावत महापौरांनी नगर सचिव अनिल बिडवे यांना सूचीवरील विषयांचे वाचन करण्याचे निर्देश दिले. हा प्रकार पाहून शिवसेनेच्या नगरसेवकांनी आरोपांच्या फैरी झाडणे सुरू केले. त्यांच्या मदतीला काँग्रेसचे गटनेता साजीद खान पठाण, नगरसेवक डॉ. जिशान हुसेन, पराग कांबळे, मोहम्मद इरफान धावून आले. या गदारोळात महापौर विजय अग्रवाल यांनी सर्व विषय मंजूर करत सभा संपल्याचे जाहीर केले.
प्रशासन ढिम्म का?
प्रभागांमध्ये जलवाहिनीचे जाळे टाकताना पाइप किमान साडेतीन ते चार फूट खोल अंतरावर टाकणे अपेक्षित असताना संबंधित कंत्राटदार अवघ्या दीड ते दोन फूट खोल अंतरावर पाइप टाकत आहे. रस्ता खोदल्यानंतर तो तातडीने दुरुस्त करणे भाग आहे. मंजूर निविदेत रस्ता दुरुस्तीच्या खर्चाचा समावेश आहे. कंत्राटदाराने रस्ते दुरुस्तीला ठेंगा दाखवला आहे. ही बाब प्रशासनाच्या अखत्यारित असताना प्रशासन ढिम्म का, असा सवाल उपस्थित होत आहे.
महिला व बाल कल्याण समितीचे गठन
महिला व बाल कल्याण समितीचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे सभेत नऊ पैकी आठ महिला सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये सुनीता अग्रवाल, जान्हवी डोंगरे, मनिषा भंसाली, मंगला म्हैसने, सोनी आहुजा, अनुराधा नावकार, उषा विरक, प्रमिला गीते यांचा समावेश आहे. काँग्रेसने सदस्यपदासाठी नाव दिले नाही.
मिश्रा म्हणाले, चर्चा करा!
‘अमृत’च्या जलवाहिनीच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असताना त्यावर सभागृहात चर्चा करण्याची गरज आहे. महापौर साहेब, तुम्ही चर्चा करा किंवा आयुक्तांना खुलासा करू द्या, अशी मागणी राजेश मिश्रा यांनी केली.
महापौर म्हणाले की, शासनाकडे तक्रार करा!
यासंदर्भात तुम्ही मनपा आयुक्त किंवा शासनाकडे तक्रार करू शकता. या कामाची चौकशी लावा; मात्र सभागृहात चर्चा होणार नाहीच, असे महापौर विजय अग्रवाल यांनी मिश्रा यांना ठणकावून सांगितले.