आॅनलाइन नोंदणी होऊनही दिव्यांगांची तपासणी नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 02:08 PM2019-05-20T14:08:02+5:302019-05-20T14:08:07+5:30
अकोला : दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आॅनलाइन अर्ज करूनही दिव्यांगांना वैद्यकीय चाचणीसाठी तीन ते चार महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आॅनलाइन अर्ज करूनही दिव्यांगांना वैद्यकीय चाचणीसाठी तीन ते चार महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. एकीकडे अर्जदारांची संख्या वाढत असताना, दिव्यांगांच्या वैद्यकीय चाचणीला विलंब होत आहे. परिणामी, अनेकांना विविध शासकीय योजनांपासून मुकावे लागत आहे.
दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दिव्यांगांची होणारी लूट तसेच बनावट दिव्यांग प्रमाणपत्रधारकांवर अंकुश लावण्याच्या उद्देशाने दिव्यांग कक्षाची स्थापना करण्यात आली. यांतर्गत दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दिव्यांगांना आॅनलाइन अर्ज सादर करावा लागतो. अर्ज सादर केल्यानंतर आठवडाभरात अर्जदाराला सर्वोपचार रुग्णालयातील दिव्यांग कक्षात वैद्यकीय तपासणीसाठी बोलाविणे अपेक्षित आहे; परंतु अर्ज करूनही दिव्यांगांना वैद्यकीय तपासणीची तारीख दिली जात नाही. यातील अनेकांना तीन ते चार महिने होऊनही तपासणीसाठी बोलाविण्यात आले नाही. चाचणीअभावी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळू शकत नाही. प्रमाणपत्र नसल्याने जिल्ह्यातील अनेक दिव्यांग मंडळींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येत नसल्याने दिव्यांगांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
नऊ हजार अर्ज, तपासणी मात्र दोनच दिवस
दिव्यांग प्रमाणपत्रासाठी नऊ हजारांपेक्षा जास्त दिव्यांगांनी आॅनलाइन अर्ज केले आहेत. या दिव्यांगांची तपासणी मात्र आठवड्यातून दोन दिवस केली जाते. एका दिवसात केवळ ३० ते ४० रुग्ण बोलाविण्यात येतात. त्यामुळे दिवसेंदिवस अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने वेटिंग लिस्टही वाढत आहे.
दिव्यांग कक्षांतर्गत आठवड्यातून दोन दिवस दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. जास्तीत जास्त अर्जदारांची वैद्यकीय तपासणी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत; परंतु येणाºया अर्जांची संख्या वाढत आहे.
- डॉ. कुसुमाकर घोरपडे,
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला.