परराज्यातून रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची तपासणीच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 11:31 AM2020-11-28T11:31:27+5:302020-11-28T11:33:47+5:30
Akola Railway Station अकोल्यातील रेल्वे स्थानकावर अशा प्रवाशांची चाचणीच केली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
अकोला: राज्यात दाखल होण्यापूर्वी प्रत्येक प्रवाशाने कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल दाखविणे राज्य शासनाने अनिवार्य केले आहे; परंतु अकोल्यातील रेल्वे स्थानकावर अशा प्रवाशांची चाचणीच केली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. हा प्रकार कोरोनाच्या फैलावासाठी पोषक ठरत आहे.
दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. तर राज्यात दुसऱ्या लाटेचाही इशारा शासनाने दिला आहे. अशा परिस्थितीत राज्य शासनातर्फे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी परराज्यातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल दाखविण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे; मात्र अकोला रेल्वे स्थानकावर परराज्यातून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची प्राथमिक वैद्यकीय तपासणीदेखील केली जात नाही. शिवाय, त्यांचे कोरोनाचे निगेटिव्ह अहवालांचीही चाचणी केली जात नसल्याचे वास्तव आहे. हा प्रकार कोरोनाच्या फैलावास कारणीभूत ठरत असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
आदेश येताच व्यवस्था करू
यासंदर्भात रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, प्रवाशांच्या चाचणी संदर्भात सध्यातरी कुठलेही आदेश किंवा सूचना प्राप्त झाल्या नाहीत. वरिष्ठ स्तरावरून आदेश मिळताच व्यवस्था केली जाणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
दररोज येणारे प्रवासी - ६००
येणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या - २०
रेल्वे स्थानकावर कोरोना टेस्टिंगची सुविधाच नाही
परराज्यातून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे निगेटिव्ह अहवाल तपासणे तर सोडा, येथे येणाऱ्या एकाही प्रवाशाच्या कोरोना टेस्टिंगची सुविधा अकोला रेल्वे स्थानकावर नाही. त्यामुळे रेल्वेत पॉझिटिव्ह रुग्णाचा प्रवास झाला, तरी त्याच्याकडे कोणाचे लक्ष नसल्याचे वास्तव आहे.