जिल्ह्यात ८०५ शाळांत इंटरनेटच नाही, मग ऑनलाइन एज्युकेशन सुरू कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:13 AM2021-07-09T04:13:45+5:302021-07-09T04:13:45+5:30

अकोला : कोरोनामुळे सध्या शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात येत आहे. परंतु ऑनलाइन शिक्षणावर भर देताना, ...

There is no internet in 805 schools in the district, so how to start online education? | जिल्ह्यात ८०५ शाळांत इंटरनेटच नाही, मग ऑनलाइन एज्युकेशन सुरू कसे?

जिल्ह्यात ८०५ शाळांत इंटरनेटच नाही, मग ऑनलाइन एज्युकेशन सुरू कसे?

googlenewsNext

अकोला : कोरोनामुळे सध्या शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात येत आहे. परंतु ऑनलाइन शिक्षणावर भर देताना, जिल्ह्यातील किती शाळांमध्ये इंटरनेट, वीज नाही याचा शासन विचारच करीत नाही. जिल्ह्यातील शाळांचा आढावा घेतला असता, जिल्ह्यातील ८०५ शाळांमध्ये इंटरनेटची सुविधाच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या शाळांमध्ये इंटरनेट नाही. विजेचे कनेक्शन नाही. त्यामुळे येथील शिक्षक, विद्यार्थ्यांना केवळ मोबाइलच्या आधारेच ऑनलाइन एज्युकेशन द्यावे लागत आहे. आरटीई कायद्यानुसार प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इंटरनेट, वीज असणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास करायचा असेल तर शाळांमध्ये इंटरनेट हवेच. परंतु शासनाच्या शिक्षणविषयक उदासीन धोरणांमुळे अनेक शाळा विजेच्या कनेक्शनपासून, इंटरनेटपासून लांब आहेत. शाळेतील शैक्षणिक कामे, विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज, आधार लिकिंग आदींसह शाळासंबंधीच्या कामांसाठी इंटरनेटची गरज भासते. परंतु या शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षकांना बाहेरील इंटरनेट कॅफेवर जाऊन ही कामे करावी लागत आहेत. शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील अकोला पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या १६९ शाळांमध्ये इंटरनेटच नाही. तसेच अकोट तालुक्यातील १३५, बाळापूर तालुक्यातील ९४, बार्शीटाकळी ११२, मूर्तिजापूर तालुक्यातील ११७, पातूर तालुक्यातील ९०, तेल्हारा तालुक्यातील ८८ शाळांमध्ये इंटरनेटची सुविधाच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणावर परिणाम हाेत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील एकूण शाळा १८६८

जिल्ह्यातील शासकीय शाळा ९१२

जिल्ह्यातील अनुदानित शाळा ६७४

विनाअनुदानित शाळा २८२

ऑनलाइन शिक्षण म्हणजे काय असते रे भाऊ!

आमच्या शाळेत इंटरनेटची सुविधा आहे. कॉम्प्युटर आहेत. परंतु सध्या शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मोबाइलवरूनच ऑनलाइन शिक्षणाचे वर्ग होत आहे. बऱ्याचदा इंटरनेट, नेटवर्कच्या अडचणी येतात. शिक्षकही छान शिकवित आहेत.

- सम्यक गौतम पोहुरकर, विद्यार्थी, जि.प. शाळा, दहिगाव गावंडे

आमच्या शाळेत इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे शाळेतील शिक्षक मोबाइलच्या माध्यमातूनच ऑनलाइन वर्ग घेतात. ऑनलाइन शिक्षण घेताना, अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने प्राथमिक शाळा सुरू कराव्यात.

-पायल उमेश चव्हाण, विद्यार्थिनी, जि.प. शाळा, कौलखेड जहांगीर

जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही. विजेचे कनेक्शन नाही. त्यामुळे अडचणी येतात. शासनाकडून पुरेसा निधी मिळत नाही. अनेकदा वीजबिल थकीत असल्यामुळे जि.प. शाळांचे वीज कनेक्शन कापण्यात येते. स्मार्ट फोनच्या आधारे शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात.

-डॉ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी प्राथमिक

जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये विजेचे कनेक्शनच नाही तर इंटरनेटची सुविधा कशी असणार? शाळांमध्ये इंटरनेट नसल्यामुळे शिक्षकांना स्मार्ट फोनच्या माध्यमातूनच ऑनलाइन शिक्षणाचे धडे द्यावे लागतात. काही शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाची सुविधा आहे. परंतु वीज कनेक्शन नसल्यामुळे त्यातही अडथळे येतात. शिक्षक आपल्या परीने ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात.

-नितीन बंडावार, केंद्रप्रमुख जि.प. शाळा

बहुतेक शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही. बऱ्याच पालकांकडे स्मार्ट फोन नाही. ते मोबाइल घेऊ शकत नाहीत. ऑनलाइन शिकवित असताना प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणे शक्य नाही. विद्यार्थीसुद्धा ऑनलाइन सुविधा नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहत आहेत. पालकही आता शाळा सुरू करण्याची मागणी करीत आहेत. ॲॅण्ड्रॉइड मोबाइल आहेत. त्यांच्याकडे रिचार्ज करण्यासाठी पैसेसुद्धा नाहीत. अशा परिस्थितीत आम्हाला शिकवताना खूप अडचणी येतात.

-सुयोग खडसे, शिक्षक, सर्वोदय विद्यालय

फोटो:

Web Title: There is no internet in 805 schools in the district, so how to start online education?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.