मतदानाच्या आकडेवारीत अनियमितता नाही - जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:51 PM2019-05-29T12:51:44+5:302019-05-29T12:51:50+5:30
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी झालेले मतदान आणि मतमोजणीतील मतदानाच्या आकडेवारीत कोणतीही अनियमिता आढळून आली नाही.
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी झालेले मतदान आणि मतमोजणीतील मतदानाच्या आकडेवारीत कोणतीही अनियमिता आढळून आली नाही. त्यामुळे यासंदर्भात करण्यात आलेली तक्रार नस्तीबद्ध करण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिले आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेच्या दिवशी दर्शविण्यात आलेले मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी आढळून आलेले मतदान, यामध्ये १३९ मतांचा फरक असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे निवडणूक प्रतिनिधी ज्ञानेश्वर सुलताने व प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी २७ मे रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे केली होती. मतदान केंद्राध्यक्षांनी झालेल्या मतदानाची आकडेवारी कळविताना लेखनप्रमाद करणे, टंकलेखनात प्रमाद होणे किंवा निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्राच्या आधारे केलेले मतदान झालेल्या मतदानात न मोजल्यामुळे किंवा केलेल्या मतदानाची दुबार नोंद घेणे इत्यादी कारणांमुळे आकडेवारीत तफावत निर्माण झाल्याचे दिसून येते. यासंदर्भात सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या स्तरावर परिपूर्ण छाननी करण्यात आली असता, कोणतीही अनियमितता आढळून आली नाही. त्यामुळे तक्रार नस्तीबद्ध करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाºयांनी वंचित बहुजन आघाडीचे ज्ञानेश्वर सुलताने व राजेंद्र पातोडे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.