महा-डीबीटी पोर्टलवर शेतशिवारांचे नावच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:23 AM2021-08-12T04:23:49+5:302021-08-12T04:23:49+5:30
बाळापूर : कृषी विभागामार्फत महा-डीबीटी पोर्टलद्वारे विविध योजना राबवून शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे. मात्र बाळापूर शहारातील पाच शेतशिवारांचे ...
बाळापूर : कृषी विभागामार्फत महा-डीबीटी पोर्टलद्वारे विविध योजना राबवून शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे. मात्र बाळापूर शहारातील पाच शेतशिवारांचे नावच येत नसल्याने अनेक शेतकरी शासकीय अनुदानापासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे. सहा महिन्यांपासून शेतकरी योजनेपासून वंचित राहत आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शेतशिवारांची नावे समाविष्ट करण्याची मागणी होत आहे.
कृषी विभागाने महा-डीबीटी पोर्टलवर नगर परिषद बाळापूर क्षेत्र म्हणून समाविष्ट केले, परंतु शहरातील काही शेतकऱ्यांचे शेतशिवार हे बाभूळखेड, काळबाई, कासारखेड, गाझीपूर, मोधापूर आहे, परंतु बाळापूर मंडळ कृषी अधिकाऱ्यांच्या लॉगीनमध्ये शहरातील पाचही शिवार दिसत नसल्याने अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. शेतकरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात चकरा मारत असल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना लाभ देण्याची मागणी होत आहे.
----------------------
महा-डीबीटी पोर्टलवर बाळापूर शहरातील पाचही शेतशिवार समाविष्ट करण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षकांकडे पत्र देऊन माहिती समाविष्ट करण्यासाठी पुणे येथील पोर्टलवर दुरुस्तीसाठी प्रशासकीय प्रयत्न सुरू आहेत. लवकरच शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न आहे.
- नंदकिशोर माने, तालुका कृषी अधिकारी, बाळापूर.
--------------------
गेल्या सहा महिन्यांपूर्वी कृषी विभागाकडून शेती साहित्य अनुदान मिळण्यासाठी महा-डीबीटी या कृषी विभागाच्या पोर्टलवर अर्ज केला. अर्ज लाॅटरी पद्धतीने लाभार्थी म्हणून निवड झाल्याचा मेसेज आल्यावर कागदपत्रे अपलोड केली, परंतु मंडळ कृषी अधिकाऱ्यांच्या लाॅगीनला दिसत नसल्याने अनुदानापासून वंचित आहे.
- मयूर संतोष वानखडे, काळबाई शिवार बाळापूर.